सोलापूर - शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख महेश कोठे यांचा राष्ट्रवादी प्रवेश लांबणीवर पडला आहे. त्यातच कोठे यांची शिवसेनेतून कायम हकालपट्टी करण्यात आल्याचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी शुक्रवारी जाहीर केले. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनीच याबाबतचे आदेश दिल्याचे बरडे म्हणाले.
महेश कोठे यांनी गुरुवारी शिवसेना सोडल्याचे जाहीर केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी ते आणि त्यांचे समर्थक गुरुवारी रात्रीच मुंबईत पोहाचले आहेत. शुक्रवारी सकाळी ११ वाजता यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये महेश कोठे यांचा राष्ट्रवादी प्रवेश होईल, असे कोठे समर्थकांकडून सांगण्यात आले होते. मात्र प्रवेशाचा कार्यक्रम लांबणीवर टाकण्यात आला आहे. या राजकारणाचे पडसाद उमटले आहेत. शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी कोठे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्याचे जाहीर केले.
विधानसभा निवडणुकीत कोठे यांनी शिवसेना उमेदवाराच्या विरोधात बंडखोरी केली होती. त्यावेळीही कोठे यांची सेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर कोठे पुन्हा सेनेत सक्रिय झाले होते. यादरम्यान त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. आता पुन्हा त्यांची हकालपट्टी केल्याचे जाहीर केले.