उत्तर सोलापूर : घरकुलाची अंतिम देयके बांधकाम खात्याकडे थांबतात अन् आम्ही कसे जबाबदार? तालुक्याच्या विकासासाठी एकतर्फी भूमिका न घेता सुसंवाद ठेवा, त्यासाठी अधिकारी व संघटना पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवा, असे पत्र ग्रामसेवक संघटनेने गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहे. यामुळे प्रशासनातील वाद चव्हाट्यावर आला आहे.
उत्तर सोलापूर तालुका ग्रामसेवक संघटनेने गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात दहा मागण्या केल्या आहेत. सर्व प्रकारच्या घरकुलांचा शेवटचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी बांधकाम विभागाकडून मूल्यांकन प्रमाणावर जोडून पंचायत समितीला येणे आवश्यक आहे. गावातून प्रस्ताव तयार करून बांधकाम खात्याकडे ग्रामसेवकाने दिला, तर अभियंता प्रस्ताव घेत नाहीत. लाभार्थ्यांना पाठवून द्या, असे सांगतात. त्यामुळे घरकुल अपूर्ण दिसत असल्याचे पत्रात म्हटले आहे.
तालुक्याच्या विकासासाठी एकतर्फी भूमिका न घेता सुसंवाद ठेवणे आवश्यक असल्याचे संघटनेने म्हटले आहे. मासिक पगारपत्रक मिळावे, स्वयंमूल्यमापन प्रत मिळावी व इतर मागण्यांचा संघटनेने दिलेल्या पत्रात उल्लेख केला आहे.
--
संघटना झाल्या एक
ग्रामसेवक संघटनेचे तालुका पदाधिकारी निवडण्यासाठी मतदान झाले होते. यामध्ये ग्रामसेवकांमध्ये दोन गट पडले होते. पदाधिकारी निवडीसाठी जुने व नवे असे दोन गट पडले होते. मात्र, सहा महिन्यांपासून ग्रामसेवकांना प्रशासनाकडून त्रास सुरू असल्याने सर्वच ग्रामसेवक एक झाले असल्याचे सांगण्यात आले.
---
ग्रामसेवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक लावा, चर्चा करा, असे सांगितले आहे. विस्तार अधिकाऱ्यांचे एक पद मंजूर असताना दोघांकडे पदभार कसा, असा प्रश्न विचारला. सध्या ग्रामसेवकांची प्रशासनाकडून चौकशीच्या नावाखाली अवहेलना सुरू असल्याचे ग्रामसेवकांनी सांगितले.
- रजनी भडकुंबे
सभापती, उत्तर तालुका