शासनाने सोलापूर जिल्ह्यासाठी सर्वप्रथम २५ हजार ३६५ क्विंटल मका खरेदीचे उद्दिष्ट दिले होते. जिल्ह्यात १ लाख २५ हजार क्विंटलपेक्षा अधिक मक्याचे उत्पादन झाले आहे. दिलेले उद्दिष्ट तोकडे असल्याने वाढवून देण्याची मागणी मान्य केली. दुसऱ्या टप्प्यात ३८ हजार क्विंटल खरेदीचे उद्दिष्ट दिले. तेही कमी पडत असल्याचे दिसताच जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आणखी १० हजार क्विंटल वाढवून देण्याची मागणी केली. त्यानुसार जिल्ह्यात ११ खरेदी केंद्रावर ७३ हजार ३६५ क्विंटल मक्याची खरेदी केली.
जिल्ह्यात ६ हजार ५३९ शेतकऱ्यांनी मका विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी केली होती. त्यापैकी ३ हजार ९५ शेतकऱ्यांना मोबाईल संदेशद्वारे खरेदीसाठी बोलावले. त्यातच उद्दिष्ट पूर्ण झाल्यामुळे २२४८ शेतकरी वंचित राहिले आहेत. त्यांच्याकडे ५० हजार ४४८ क्विंटल मका शिल्लक आहे. उद्दिष्टपूर्तीनंतर मका खरेदी बंद केल्याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.
प्रतिक्विंटल ५५० रुपये तोटा
यंदा मक्याचे बंपर उत्पादन झाले आहे. बाजारात मागणी कमी आणि भावही उतरलेले आहेत. त्यामुळे शेतकरी शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेत मक्याची विक्री करण्यास उत्सुक होते. बाजार भाव १३०० रुपये प्रतिक्विंटल असून शासनाचा हमीभाव १८५० रुपये प्रतिक्विंटल आहे. विक्री विना शिल्लक राहिलेल्या मक्यासाठी आता शेतकऱ्यांना ५५० रुपये प्रतिक्विंटल तोटा सहन करावा लागणार आहे. खरेदीपासून वंचित शेतकरी जिल्हा मार्केटिंग कार्यालयाकडे वारंवार विचारणा करीत आहेत.
११ केंद्रावर केली खरेदी
सोलापूर जिल्ह्यात ११ खरेदी केंद्रावर मका खरेदी करण्यात आला. अकलूज, बार्शी, करमाळा, कुर्डूवाडी, मंगळवेढा, मरवडे, नातेपुते, पंढरपूर, अनगर, सांगोला, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यासाठी शासकीय गोदामात खरेदी केलेल्या मक्याची ९ कोटी ८१ लाख रक्कम उत्पादकांच्या बँक खात्यात ऑनलाईन जमा केली. ३ कोटी ७४ लाख रुपये लवकरच जमा करण्यात येणार आहे. योजनेतून १३ कोटी ५६ लाख रुपयांची मका खरेदी केली. बाजारभावापेक्षा अधिक दर, तातडीने बँक खात्यावर रकमा जमा होत असल्याने या योजनेत मका विक्री करण्यावर शेतकऱ्यांचा अधिक कल आहे.
कोट :::::::::::
ऑनलाईन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी काही जणांकडे मका विक्रीअभावी राहिला आहे. आमच्या वरिष्ठ कार्यालयामार्फत शासनाला कळवले आहे. वाढीव खरेदी आणि मुदत वाढवून देण्याची मागणी केली आहे.
- भास्कर वाडीकर ,
जिल्हा मार्केटिंग अधिकारी, सोलापूर