शेतकऱ्यांचे कोणतेही पीक उत्पादन बाजारात आले की दरात घसरण होते अन् बाजारात शेतकऱ्यांकडून आवक थांबली की दरात वाढ होते. यामुळेच केंद्र सरकार काही शेती उत्पादने हमीभावाने खरेदी करते. ज्यावेळी बाजारात धान्याचे दर पडतील, त्यावेळी शेतकऱ्यांकडून धान्य खरेदीचा उद्देश हमीभाव केंद्राचा आहे. मकाही हमीभावाने खरेदी केला जातो.
या महिन्यात मक्याचा बाजारात हमीभावापेक्षा दर खाली आल्याने जिल्ह्यात १० ठिकाणी हमीभाव केंद्रे सुरू करण्यात आली. हमीभावाने मका खरेदी करण्यासाठी जिल्ह्यातील ५२५ शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली होती. हमीभाव केंद्र सुरू होताच व्यापाऱ्यांनी मक्याचे दर हमीभावाप्रमाणे व त्यापेक्षा ५० रुपये अधिक केले आहेत. हमीभाव प्रति क्विंटल १८५० रुपये इतका असताना १९०० रुपयाने अडते मका खरेदी करीत असल्याचे सांगण्यात आले.
यामुळे नोंदणी केलेले शेतकरीही हमीभाव केंद्राकडे फिरकत नाहीत.
जिल्ह्यात सांगोला, अनगर, पंढरपूर, नातेपुते, मंगळवेढा, अकलूज, माळकवठे, बार्शी, करमाळा व कुर्डूवाडी या ठिकाणी मका खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.
-----
११७ क्विंटल मका खरेदी
जिल्ह्यातील १० पैकी केवळ सांगोला येथे ९८ क्विंटल व नातेपुते येथे १७ क्विंटल मका खरेदी झाली आहे. इतर केंद्रांवर मका खरेदी झाली नसल्याचे जिल्हा मार्केटिंग अधिकारी वाडीकर यांनी सांगितले.
----
हरभरा खरेदीचा आज शेवट दिवस
हरभरा खरेदीसाठी ६०४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. हरभऱ्याची बार्शी, मंगळवेढा व करमाळा येथे खरेदी सुरू आहे. येत्या २५ जूनपर्यंत ही खरेदी सुरू राहणार आहे. हरभऱ्याचा हमीभाव प्रति क्विंटल ५ हजार १०० रुपये आहे. बाजारात हरभरा ४,३०० ते ४,४०० रुपयाने विकला जात असल्याचे सांगण्यात आले.
-----