सोलापूर - नेहरू वसतिगृहाचा पदभार देण्यासाठी अक्कलकोट तालुक्यातील गौडगाव येथे नियुक्तीस असलेल्या शिक्षकाची सोलापुरातील मजरेवाडी शाळेत पद नसताना केलेली बदलीसोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी शुक्रवारी रद्द केली आहे. या चुकीच्या बदलीनेशिक्षक संघटनांतून व्यक्त होत असलेल्या संतापाची सीईंओंनी दखल घेतल्याने प्राथमिक शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
शिक्षण अधिकारी संजयकुमार राठोड यांनी ३० जून रोजी गौडगावच्या पाटीलवस्ती शाळेतील उपशिक्षक एस. पी. चव्हाण यांची लोकमान्यनगर झेडपी शाळेत बदली केली आहे. पहिली ते पाचवीपर्यंत असलेल्या या शाळेचा चालूवर्षाचा पट फक्त ४० आहे. त्यामुळे येथे दोनच शिक्षकांची नियुक्ती नियमानुसार असताना चव्हाण यांची बेकायदेशीरपणे पदस्थापना करण्यात आल्याचे जुनी पेन्शन हक्क संघटनेचे प्रशासक राजू कोळी म्हटले होते. तर लोकमान्यनगर शाळेवर चव्हाण यांची केलेली बदली तातडीने रद्द करावी, अशी मागणी सोलापूर जिल्हा प्रा. शिक्षक संघांचे अध्यक्ष शिवानंद भरले यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे केली होती. ठराविक शिक्षकांची सोय करण्यासाठी शिक्षण विभाग काहीही करते, असा समज शिक्षकांत निर्माण झाला आहे. ऑनलाइन बदल्यात ४० महिला शिक्षिका विस्थापित झाल्या आहेत. असे असताना सोयीची नियुक्ती देणे सयुक्तिक होणार नाही असे शिवानंद भरले यांनी म्हटले होते.
लोकमत चा पाठपुरावा यशस्वी
गौडगाव येथील पाटील वस्ती शाळेचे शिक्षक चव्हाण यांची सोय लावण्यासाठी सोलापुरातील लोकमान्य नगर शाळेत केलेली बदली कशी बेकायदेशीर आहे, याबाबत लोकमत ने गेल्या दोन दिवसांपासून वृत्त प्रकाशित करून पाठपुरावा केला होता. याची दखल घेत शुक्रवारी सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी चव्हाण यांची बदली रद्द करण्याचा आदेश जारी केला. यामुळे लोकमत च्या बातमीला यश मिळाल्याचे शिक्षक संघटनांनी म्हटले आहे.