मोहोळ : फेफरे आल्याने खाली पडून मृत्युमुखी पडलेल्या मजुराचा खून केल्याचे निष्पन्न झाल्याने दोघांविरूद्ध पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजेभाई सय्यद पठाण (वय ४०, मूळ गाव कुरनूर, ता. अक्कलकोट) हा क्रांतीनगर येथे गेल्या १५ वर्षांपासून मोलमजुरी करून उपजीविका करतो. १७ जून रोजी दुपारी दोन वाजता फेफरे येऊन पडल्याने त्याला सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचा मेव्हणा साकीब रमजान शेख याने तशी नोंद केली होती. त्याच दिवशी त्याचा सायंकाळी मृत्यू झाला.राजेभाई याचा फेफरे येऊन मृत्यू झाला असून, मृतदेह घेऊन येत आहोत, असे त्याच्या नातेवाईकांना सांगण्यात आले; मात्र मृतदेह १८ तारखेस दुपारी ३.३० वाजता कुरनूर या गावी नेऊन देण्यात आला. नातेवाईकांनी त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. दरम्यान, क्रांतीनगर परिसरातील नागरिक व महिलांनी तुमचा मुलगा मेला नसून त्याला मारण्यात आले असल्याचे सांगितल्यानंतर राजेभाईच्या आईने टाहो फोडला .
मयताची वृद्ध आई हजरतबी पठाण (वय ७०) आणि भाऊ बंदेनवाज व त्याच्या नातेवाईकांनी मोहोळ पोलिसांत येऊन राजेभाई हा फेफरे येऊन मेला नसून त्याचा खून केला आहे, अशी शंका व्यक्त केली. मोहोळ पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असता ही घटना फेफरे येऊन पडून झालेली नसून, या मजुराचा खून झाल्याचे स्पष्ट झाले. खून करुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणारा मयत राजेसाब याचा मेव्हणा मेहबुब रमजान शेख (वय २३) व सासू हुसनमाबी रमजान शेख (वय ५५) या दोघांच्या विरोधात मोहोळ पोलीस ठाण्यात भादंवि ३०२ , २०१ प्रमाणे रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सहायक पोलीस निरीक्षक इंगळे हे करीत आहेत.