आॅनलाइन लोकमत सोलापूर सोलापूर दि. २१ :- फळे, भाजीपाला पिकांना परदेशी बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी या मालाची साठवणूक, प्रक्रिया आणि नियातीसाठी मुंबई, नागपूर, पुणे, औरंगाबाद येथे व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. फळे, भाजीपाला उत्पादनास हमी भाव मिळावा, यासाठी शासन स्तरावरुन केंद्रशासनाकडे शिफारस करण्याचा मानस असल्याचे प्रतिपादन सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी आज आंबा महोत्सव उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी केले.महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे आणि कृषी उत्पन बाजार समिती सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने येथील होम मैदान येथे आयोजित आंबा महोत्सवाचे उद्घाटन पणन मंत्री देशमुख यांच्या हस्ते झाले त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास महापौर शोभा बनशेट्टी, बाजार समितीचे प्रशासक कुंदन भोळे, पणन मंडळ पुणेचे उपव्यवस्थापक प्रशांत सोनवणे, जिल्हा उपनिबंधक नारायण आघाव, स्वामी समर्थ सहकारी सूत गिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवतारे, अविनाश महागावकर, शहाजी पवार यांच्यासह मान्यवर पदाधिकारी, नगरसेवक, आंबा उत्पादक शेतकरी, स्टॉलधारक व नागरिक उपस्थित होते.पणन मंत्री देशमुख म्हणाले, राज्यातील सर्व फळ व भाजीपाला पिकांना बाजार पेठ उपलब्ध करुन देण्यासाठी पणन मंडळ व कृषी उत्पन बाजार समिती मार्फत प्रयत्न केले जातील. यासाठी प्रत्येक जिल्हास्तरावर फळ महोत्सव आयोजित करण्यात येईल. शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेल्या मालाला चांगला भाव मिळावा, त्याला त्याचे मार्केटिंग करता यावे यासाठी शेतकऱ्यांना याबाबतचे प्रशिक्षण देण्यात येईल.ज्यावेळी शेतकऱ्याचा माल विक्रीसाठी उपलब्ध असतो त्यावेळी त्याला बाजारात योग्य भाव मिळत नाही. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडतो. यावर मात करण्यासाठी व शेतकऱ्याला मदत करण्यासाठी शासनाने शेतीमाल तारण योजना सुरु केली आहे. या योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन पणन मंत्री देशमुख यांनी केले. या योजनेतून शेतकऱ्याला केवळ सहा टक्के दराने रक्कम मिळते असेही त्यांनी सांगितले.शेतकऱ्यांनी केवळ शेतीवर अवलंबून न राहता शेतीपूरक व्यवसायात पुढे येणे गरजेचे आहे. यासाठी शेतकऱ्यांबरोबरच गावातील सेवा सोसायट्यांनी एकतरी शेती पूरक व्यवसाय सुरु करुन शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी हातभार लावावा. यासाठी आवश्यक असणारी मदत शासन स्तरावरुन केली जाईल, असेही पणन मंत्री देशमुख म्हणाले.सोलापूर येथील आंबा महोत्सवातील सहभागी शेतकऱ्याला आकारण्यात येणाऱ्या स्टॉल भाड्यात ५० टक्के सवलत द्यावी,अशा सूचना पणन मंत्री देशमुख यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. महोत्सवामध्ये सर्व सोलापुरकरांनी सहभागी होऊन शेतकऱ्यांकडून आंबा खरेदी करावा असे आवाहन देशमुख यांनी केले.शेतकऱ्याच्या मालाला चांगला भाव मिळावा यासाठी शासनस्तरावरुन सकारात्मक निर्णय होत आहे ही कौतुकाची बाब आहे. शेतकऱ्यांचा जीवनात परिवर्तन होण्यास शासनाने फळ व भाजीपाला पिकांनाही हमी भाव देणे गरजचे असल्याचे मत स्वामी समर्थ सहकारी सूत गिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवतारे यांनी व्यक्त केले.आंबा महोत्सव सोलापूरकरांसाठी पर्वणी असून पणन मंडळाने घेतलेल्या आंबा महोत्सवास सोलापूरकरांनी भरभरुन प्रतिसाद द्यावा असे आवाहन महापौर शोभा बनशेट्टी यांनी केली.
फळे, भाजीपाला साठवणूक व नियातीसाठी व्यवस्था निर्माण करणार : पणनमंत्री सुभाष देशमुख
By admin | Published: April 21, 2017 6:00 PM