आॅनलाइन लोकमत सोलापूर पंढरपूर/ सोलापूर ०३ :- आषाढी यात्रा कालावधीत मंदिर समितील सर्व विभागांनी समन्वयाने काम करुन भाविकांना जलद व सुलभ दर्शन व्यवस्था उपलब्ध करुन देण्याबरोबरच यात्रा व्यवस्थित व सुरळीत पार पाडण्यासाठी त्यांना नेमून दिलेली कामे जबाबदारीने पार पाडावीत अशा सुचना जिल्हाधिकारी तथा मंदीर समितीचे सभापती डॉ.राजेंद्र भोसले यांनी दिल्या.आषाढी यात्रा २०१७ संदर्भात शासकीय विश्रामगृह पंढरपूर येथे दिनांक २ रोजी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या विविध विभांगाची आढावा बैठक घेण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत त्यांनी सूचना दिल्या. याप्रसंगी उपजिल्हाधिकारी संजय तेली, प्रांतधिकारी तथा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी डॉ.विजय देशमुख, तहसिलदार मधुसूधन बर्गे, मंदिर समितीचे व्यवस्थापक विलास महाजन, नगर अभियंता दिनेश शास्त्री, लेखाधिकारी श्री वाळुंजकर आदी उपस्थित होते.या आढावा बैठकीत बोलताना जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले म्हणाले की, आषाढी यात्रेनिमित्त येणा-या भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. यासाठी मंदिर समितीने दर्शन रांगेत व दर्शन मंडपात सर्व आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात. तसेच दर्शन रांगेसाठी बॅरीकेंटींग व्यवस्था, दर्शन मंडप व मंदिर स्वच्छता, स्वच्छ पिण्याचे पाणी, सी.सी.टीव्ही कॅमेरे, अखंडीत वीज पुरवठा सुरु ठेवण्यात यावा. मंदिरातील वातानुकूलीत यंत्रणा कार्यान्वित ठेवण्यात यावी. तसेच कुठल्याही प्रकारचे गैरवर्तन झाल्याचे आढळून आल्यास सुरक्षा विभागाशी संपर्क साधावा असेही जिल्हाधिकारी डॉ.भोसले यांनी यावेळी सांगितले.प्रांतधिकारी तथा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी डॉ. विजय देशमुख यांनी मंदिर समितील विविध विभागांची माहिती दिली यात प्रामुख्याने बांधकाम विभाग, अन्नछत्र विभाग, भक्त निवास, गोशाळा, लेखा विभाग, आॅनलाईन दर्शन व्यवस्था तसेच हंगामी व कायम कर्मचारी यांच्या बाबतची माहिती दिली . यावेळी जिल्हाधिकारी डॉ.भोसले यांनी माहिती घेऊन संबंधिताना आवश्यकत्या सूचना दिल्या. या बैठकीस मंदिर समिचे सर्व विभाग प्रमुख व संबंधित कर्मचारी उपस्थित होते.
आषाढी यात्रेत भाविकांना जलद व सुलभ व्यवस्था निर्माण करा जिल्हधिकारी राजेंद्र भोसले यांच्या सुचना़
By admin | Published: June 03, 2017 5:29 PM