सोलापूर : कोरोनाला हरविण्यासाठी प्रत्येकाने मास्कचा वापर करणे गरजेचे आहे. सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शहर आणि जिल्ह्यात मास्कची सक्ती करण्याच्या सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पालिका आणि जिल्हा प्रशासनाला केल्या.
सोलापूर शहरातील वॉर्ड १५ मध्ये 'माझे कुटुंब- माझी जबाबदारी' मोहिमेच्या पाहणीदरम्यान भरणे बोलत होते. यावेळी महापौर कांचना यन्नम, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, नगरसेवक चेतन नरोटे, वैष्णवी करगुळे, विनोद भोसले, उपायुक्त धनराज पांडे, संतोष पवार, मनपाचे आरोग्याधिकारी डॉ. शीतल जाधव आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
भरणे म्हणाले, कोरोनाला हद्दपार करण्यासाठी ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. प्रत्येक नागरिकांनी आपली आणि कुटुंबाची जबाबदारी ओळखून मास्कचा वापर करायला हवा. वारंवार हात धुवा, सॅनिटायझरचा वापर करा. गर्दीत जाणे टाळा. लहान मुले आणि वृद्धांची काळजी घ्या. त्यांना गर्दीत जावू देऊ नका. प्रत्येकाने आपले कुटुंब निरोगी राहण्यासाठी पुढाकार घेतला तर ही मोहीम यशस्वी होईल.
जिल्ह्यातून कोरोनाला हद्दपार करण्यासाठी लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, सर्व नागरिकांची साथ हवी. ग्रामीण नागरिकांनीही आपली आणि कुटुंबाची जबाबदारी घ्यायला हवी. शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे योग्य पालन केले तर कोरोनाला दूर ठेवता येते. प्रशासकीय पातळीवर रूग्ण आणि मृत्यूदर कमी करण्यासाठी योग्य खबरदारी घेण्यात येत आहे. जिल्ह्यात आॅक्सिजनचा पुरवठा कमी पडणार नसल्याची खात्री भरणे यांनी दिली.