टेंभुर्णी : लोकांना काय मदत करणार हे महत्त्वाचे आहे. अशा प्रकारच्या गंभीर दौर्यात थिल्लर स्टेटमेंट करणे मुख्यमंत्र्यांना शोभत नाही. लोकांना मदत करण्याची यांच्यात हिम्मत नाही. मुख्यमंत्री दोन तीन तासाचा प्रवास करून थोड्या काळासाठी बाहेर पडले आहेत. यावेळी लोकांनी त्यांना काय प्रतिसाद दिला माहीतच आहे. अशी घणाघाती टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनी केली.
अतिवृष्टीमुळे माढा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीच्या पाहणी दौऱ्यानिमित्त माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस माढा तालुक्यातील गारअकोले, चांदज व टाकळी येथे आले होते. यावेळी गारअकोले येथील भीमानदीवरील फुलावर शेतकऱ्यांची गार्हाणी ऐकल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. केंद्र सरकारने आमचे पैसे अडकले आहेत ते अगोदर द्यावेत असे मुख्यमंत्री म्हणतात, यावर बोलताना फडणवीस म्हणाले की राज्याकडून जीएसटी कमी आला आहे. त्याची भर काढण्यासाठी केंद्राने कर्ज काढून राज्याला पैसे दिले आहेत.
मुख्यमंत्री फक्त टोलवाटोलवी करत आहेत. काहीही झाले की केंद्राकडे बोट दाखवायचे. तुमच्या किंमत नाही का? आम्ही सत्तेत असताना १० हजार कोटीची मदत लोकांना दिली होती. यांना मदत करायची नाही. राज्याला १ लाख 20 हजार कोटी कर्ज काढण्याची क्षमता दिलेली आहे. हे फक्त लोकांची दिशाभूल करतात.
विरोधी पक्ष नेते यांनी आज माढा तालुक्यातील गार कोले, चांदज व टाकळी या गावात भेट देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली व लोकांची व्यथा जाणून घेतली. माजी मुख्यमंत्री फडवणीस व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर व आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील हे दुपारी तीन तीस वाजता गार कोले येथील भीमा नदीवरील पुलावर दाखल झाले. यावेळी त्यांनी आपद्ग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला व त्यांच्या व्यथा जाणून घेऊन दिलासा दिला.
यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, खासदार जय सिद्धेश्वर स्वामी, माजी मंत्री विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख, आमदार प्रशांत परिचारक, आमदार राजेंद्र राऊत, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार लक्ष्मण ढोबळे, भाजपा जिल्हा अध्यक्ष श्रीकांत देशमुख, माढा तालुका अध्यक्ष योगेश बोबडे आदी मान्यवर उपस्थित होते.