राकेश कदम
सोलापूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने मॉल आणि व्यापारी संकुलाच्या व्यवस्थापनाला गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर जुळे सोलापुरातील एका मॉलमध्ये एका कुटुंबातील एका व्यक्तीला प्रवेश दिला जात आहे.
जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी मॉल आणि दुकाने चालू ठेवण्यात आली आहेत. जुळे सोलापुरातील मॉलमध्ये जीवनावश्यक वस्तू वगळता कपडे, भांडी व इतर वस्तूंची विक्री बंद करण्यात आली आहे. कर्मचारी प्रवेशद्वारावर टोकन देतात. आत सोडताना सॅनिटायझरने हात स्वच्छ करायला सांगितले जाते. एका व्यक्तीने १५ ते २० मिनिटात खरेदी संपवून बाहेर यावे, असे कर्मचारी सांगतात. मंगळवारी सकाळी लोकांची रांग लागली होती. परंतु, दुपारी आणि सायंकाळी फारशी गर्दी नव्हती. कुटुंबातील व्यक्ती आत खरेदीस गेल्यानंतर इतर सदस्य बाहेर वाट पाहत असल्याचे पाहायला मिळाले.
बुधवारी सकाळी या मॉलमधून बाहेर आलेल्या शीतल भोसले यांच्याशी ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने संवाद साधला. त्या म्हणाल्या, आयुष्यात पहिल्यांदाच मी खरेदीस गेल्यानंतर दडपणाखाली होते. लोक घाईघाईने खरेदी करीत होते.
मंगळवार बाजार अर्धाच भरला- जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने आठवडा बाजार बंद करण्यावर विचार सुरू केला आहे. मनपाच्या मंडई विभागाने मंगळवार आणि बुधवार बाजार बंद ठेवण्याचा प्रस्ताव तयार केला होता. परंतु, आयुक्तांनी त्यावर सही केली नव्हती. शहरातील मंगळवार बाजारावर अनिश्चिततेचे सावट होते. त्यामुळे बाजारात फारशी गर्दी नव्हती. मागील आठवड्याच्या तुलनेत बाजारात फारशी उलाढाल झाली नाही, असे मंडई विभागाचे प्रमुख रवी कांगरे यांनी सांगितले.