डिकसळ येथील महादेव निवृत्ती करांडे हे पत्नीसह मुंबई येथे वास्तव्यास आहेत. त्यांचे आई-वडील व मुलगी सुषमा गावी राहते. गेल्या काही दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे डिकसळ परिसरातील जुनी माळवादाची घरे गळू लागली आहेत. दरम्यान, सुषमाचे वडील महादेव निवृत्ती करांडे दोन दिवसांपूर्वी मुंबईहून गावी आल्यानंतर रविवारी ते सासूरवाडीला गेले होते. रविवारी रात्री निवृत्ती कोंडिबा करांडे पती-पत्नी घराबाहेर पत्र्यात झोपले होते. तर नात सुषमा घरात झोपली होती.
सोमवारी पहाटे ३ च्या सुमारास त्यांच्या चार खण पैकी तीन खण माळवद अचानक खाली कोसळले. यावेळी गाढ झोपेत असलेल्या सुषमाच्या अंगावर लाकडे व माती पडल्याने ती आरडा-ओरडा करू लागली. तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकून आजी-आजोबाने शेजाऱ्यांना मदतीसाठी बोलावले. दादा करांडे, दत्तात्रय करांडे यांच्यासह तरुणांनी घरात जाऊन सुषमाला माती व लाकडाच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढले. तिला बेशुद्ध अवस्थेत दवाखान्यात दाखल केले. तिच्या अंगावर व पायाला मार लागून ती जखमी झाली आहे. या घटनेत घरातील टीव्ही, कपाट, संसारोपयोगी साहित्य ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहे. तलाठी बाळासाहेब कुंभार यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा केला. यामध्ये सुमारे ७५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले.
डिकसळमधील दुसरी घटना
सध्या पावसाने उसंत घेतली असली तरी सततच्या पावसामुळे डिकसळ परिसरातील जुनी माळवादाची घरे गळण्याचे प्रमाण वाढले आहे. सहा दिवसांपूर्वी इतापे-करांडे वस्तीवरील अंकुश कृष्णा करांडे यांच्या घराची भिंत पडून नुकसान झाल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असताना सोमवारी पहाटे माळवद घर कोसळल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे
फोटो ओळ :::::::::::::::
डिकसळ येथील निवृत्ती करांडे यांचे जुने माळवादाचे घर कोसळल्याचे छायाचित्र.