हेलिकॉप्टरमधून येणार मानाच्या पालख्या; एका पालखीत असणार पाच वारकऱ्यांचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2020 05:12 PM2020-05-29T17:12:25+5:302020-05-29T17:26:20+5:30
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत झाला निर्णय
पंढरपूर : आषाढीला कुठलीही दिंडी काढायची नाही, परंतु हेलिकॉप्टर मध्ये आषाढी वारीला मानाच्या प्रमुख पालख्या पंढरपुरात आणण्याबाबत निर्णय झाला असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे.
सध्या 'कोरोना'चा रोग झपाट्याने वाढत आहे. या रोगामुळे अनेकांचा मृत्यू देखील होत आहे. हा रोग संसर्गजन्य असल्याकारणाने गर्दी टाळणे, त्यावर एक उपाय समजला जात आहे. यामुळे पंढरपुरात लाखो भाविकांची भरणाºया आषाढी यात्रेबाबत निर्णय घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी बैठक घेतली आहे. या बैठकीसाठी सर्व प्रशासकीय अधिकारी, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सहाय्यक अध्यक्ष ह.भ.प. गहणीनाथ महाराज औसेकर, प्रांत अधिकारी सचिन ढोले, कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, मंदिर समितीच्या सदस्या माधवी निगडे यांच्यासह अन्य महाराज मंडळी उपस्थित होती.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ महाराज, श्री. संत सोपान काका महाराज, श्री. संत मुक्ताई महाराज, श्री संत एकनाथ महाराज, श्री संत तुकाराम महाराज या सहा पालख्यांना पंढरपुरात प्रवेश मिळणार आहे. या पालख्यासह प्रत्येकी पाच लोक असणार आहे. पंढरपुरात श्री संत नामदेव महाराज यांच्या पालखी स्वागत करणार आहे. सर्व पादुका हेलिकाॅफटरने पंढरपूरला आणण्यात येतील, मात्र हवामान खराब असल्यास एसटी ने ५ लोक दशमीला दिवशी येतील. आषाढी एकादशीला विठ्ठलाची भेट घेऊन परत निघतील आहे, असे या बैठकीमध्ये ठरले आहे.