आप्पासाहेब पाटील, सोलापूर: वारस नोंदच्या अनुषंगाने मंडल अधिकारी कार्यालय, उमरड येथील हरकती अर्जावर सुनावणी करून तक्रारदार यांच्या बाजूने निकाल देण्याकरिता २५ हजार रूपये लाचेची मागणी करून २० हजार रूपये स्वीकारताना करमाळा तहसिल कार्यालयातील मंडल अधिकारी यास ताब्यात घेतले. ही कारवाई सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी केली.
शाहिदा युन्नूस काझी (वय ४२, मंडल अधिकारी, उमरड मंडळ, तहसिल कार्यालय, करमाळा) असे लाच घेतलेल्या महिला अधिकार्याचे नाव आहे. तक्रारदार यांनी वारस नोंदच्या अनुषंगाने मंडल अधिकारी कार्यालय, उमरड येथे हरकती अर्ज सादर केला असून या अर्जावर सुनावणी करून तक्रारदार यांच्या बाजूने निकाल देण्याकरिता मंडल अधिकारी शाहिदा काझी यांनी तक्रारदाराकडे २५ हजाराची मागणी केली होती, तडजोडीअंती २० हजार रूपये लाचेची मागणी केली व लाच रक्कम जेऊर शहरामध्ये असलेल्या मंडल अधिकारी कार्यालय, उमरड येथे स्वत: स्वीकारता असता त्यांना ताब्यात घेतले. ही कारवाई पर्यवेक्षण अधिकारी गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलीस अंमलदार स्वामीराव जाधव, अतुल घाडगे, सलीम मुलला, शाम सुरवसे आदींनी यशस्वीपणे पार पाडली.