अक्कलकोट : कुठल्याही प्रकारचे वैद्यकीय प्रमाणपत्र नसताना मैंदर्गीत (ता. अक्कलकोट) डॉक्टरकी व्यवसाय करणाऱ्यावर कोरोनाविरोधी पथकाने येथे कारवाई केली. त्याच्या दवाखान्याला या पथकाने सील ठोकले.
हणमंत जोगदे असे कारवाई करण्यात आलेल्या डॉक्टरचे नाव असून या कारवाईदरम्यान तो गावातून गायब झाल्याचे पथकाने सांगितले.
मैंदर्गीत विश्वविनायक क्लिनिक नावे जोगदे हा खासगी रुग्णालय चालवत असल्याची माहिती तहसीलदार अंजली मरोड यांना मिळाली होती. त्यांनी खात्री करून संबंधितांना कारवाईच्या सूचना दिल्या. या पथकाने धाड टाकली असता संबंधित डॉक्टर तेथून गायब झाला. या पथकाने त्यांचा दवाखाना सील केला आहे.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अश्विन करजखेडे, मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत लेखापाल अधिकारी अनिकेत सरडे, मंडल अधिकारी राणा वाघमारे, प्रकाश मानिकडे, संदीप पवार यांच्यासह नगरपालिका प्रशासन, वैद्यकीय अधिकारी, मैंदर्गी येथील प्राथमिक आरोग्य कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला.
कुठलेही वैद्यकीय प्रमाणपत्र, वैद्यकीय पदवीचे शिक्षण नसताना जोगदे याने मैंदर्गी शहरात अवैधरीत्या दवाखाना थाटला होता.
----
फोटो : ०४ अक्कलकोट
मैंदर्गी येथे बोगस डॉक्टरच्या दवाखान्यावर कारवाई करताना डॉक्टर अश्विन करजखेडे, मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे.