मंगळवेढा तहसील कार्यालयात कोरोनासंदर्भात मंगल कार्यालय मालक, हॉटेल चालक, व्यापारी अध्यक्ष व प्रतिनिधी, खासगी शिकवणी चालकांची बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. ग्रामीण भागात याचा प्रसार होऊ नये, यासाठी मंगळवेढा शहरात व ग्रामीण भागातील नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे सुरू केले पाहिजे. शहरात विना परवाना कोणताही कार्यक्रम घेता येणार नाही. लग्न कार्यास केवळ ५० जणांना मंजुरी देण्यात आली असून यासंदर्भातील नियमांचे पालन न केल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असे तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी सांगितले.
यावेळी मुख्याधिकारी निशिकांत परचंडराव, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य अजित जगताप, माजी नगराध्यक्ष भारत नागणे, नगरसेवक प्रवीण खावतोडे, कर निरीक्षक विनायक साळुंखे, व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रकाश गायकवाड, अरुण किल्लेदार, आनंद खटावकर, विष्णूपंत जगताप, रोहित ताड, माजी नगरसेवक शिवाजी जाधव, श्रीदेवी ज्वेलर्सचे रत्नपारखी आदी उपस्थित होते.