संताजी शिंदे । सोलापूर : घरात जेव्हा मुलगी वयात येते तेव्हा आई-वडिलांना तिच्या लग्नाची चिंता सुरू होते. मुलीला अपेक्षित वर मिळेल मात्र, तिच्या लग्नासाठी लागणारा पैसा हा त्याहून अधिक चिंतेचा विषय असतो. ही चिंता लक्षात घेऊन सात जोडप्यांचा विवाह लावण्याचा निर्णय बुद्धराष्ट्र प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात आला आहे. वंचितांच्या मंगळसूत्राला खºया अर्थाने ‘बुद्धराष्ट्र’चा परिसस्पर्श होत असून २५ नोव्हेंबर रोजी हा सोहळा पार पडत आहे.
एक पिता गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेतील कंत्राटी वाहन चालक म्हणून काम करतोय. आज कायम होईल, उद्या कायम होईल, या आशेपोटी आयुष्य कधी निघून गेलं माहीत नाही. लहान लहान मुलं मात्र बघता बघता मोठी झाली. मुलगी वयात आली. तिचं लग्न लावायचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. दररोज १५० ते २०० रुपयांच्या मजुरीवर सुताराचे काम करणाºया मजुरासमोरही हाच प्रश्न उभा होता. सेंट्रिंगवर जाऊन काम करणाºया बिगाºयांची व्यथाही काही वेगळी नव्हती. मार्केट यार्डात आयुष्यभर पाठीवर पोती घेऊन हमाली करणाºया बापाला दिवसेंदिवस मुलीच्या लग्नाचं ओझं वाढत होतं. भाजी विक्रीतून पै-पै जमा केला तरी संसारात चार पैसे पाठीमागे पडत नव्हते, अशात मुलीचं लग्न करायचं कसं? या विचाराने एक पिता व्याकूळ झाला होता.
पित्याचं निधन झालं, कसाबसा आईने संसार चालविला. मुलाचा संसार उभा करायचाय तर मग लग्न करणं गरजेचं आहे. कर्ता पुरुष घरात नाही. लग्नासाठी कोणाकडे हात पसराचे, या चिंतेमध्ये असताना बुद्धराष्ट्र प्रतिष्ठानने मदतीचा हात दिला आणि मुलाच्या लग्नाची चिंता मिटली. प्रत्येकाची अशी वेगळी कथा आणि व्यथा जाणून बुद्धराष्ट्र प्रतिष्ठानने यंदा प्रथमच वंचितांच्या घरातील लग्नसोहळा थाटात करण्याचा निर्णय घेतला. विजयादशमीच्या दिवशी काढण्यात येणाºया भव्य मिरवणुकीचा खर्च टाळून वंचितांच्या लग्नसोहळ्यासाठी सत्कारणी लावला जात आहे.
लग्न हा आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा सोहळा असतो, तो थाटात पार पडावा, अशी प्रत्येक मुला-मुलीची इच्छा असते. पैसा ही सर्वात मोठी अडचण सर्वसामान्य लोकांसमोर असते. ही गरज ओळखून सामुदायिक विवाह सोहळ्याचा निर्णय घेतला. प्रथम प्रयत्नात सात जोडप्यांना विवाहबद्ध करीत आहोत. - अजित गादेकर, संस्थापक, बुद्धराष्ट्र प्रतिष्ठान