बाळकृष्ण दोड्डी
सोलापूर : सौभाग्याचं लेणं म्हणून मंगळसूत्राकडे पाहिले जाते. लॉकडाऊनने हातचे काम गेले अन् रोजीरोटीचा प्रश्न श्रमिकांना पडला. जगायचं तर आहे. संसाराचा गाडा हाकण्याबरोबर मुलाबाळांचे संगोपन व्हावे, याच चिंतेतून कष्टकरी विडी महिला कामगारांचे पाय सावकारांकडे वळत आहेत. हजार रुपयांसाठी मंगळसूत्र, तर १० हजारांसाठी घर गहाण ठेवण्याची वेळ कामगारांवर आली आहे. लॉकडाऊन कधी संपेल अन् रोजीरोटी मिळेल, याची हमी नसल्याने श्रमिकांची जगण्याची धडपड काही थांबता थांबेना.
नीलम नगर येथील मलव्वा या विडी कामगार आहेत. १५ एप्रिलपासून विडी उद्योग बंद आहे. विड्या वळून त्या रोज शंभर रुपयाचं काम करीत होत्या. तशा त्या सेवानिवृत्त कामगार. वय वर्षे साठ. या वयातही त्यांना सलग आठ तास काम करणं भाग आहे. दुसरा पर्याय नाही. त्या वर्दी कामगार आहेत. वर्दी म्हणजे सेवानिवृत्त झाल्यानंतरही विडी कारखान्यात ज्या वयोवृद्ध महिला काम करतात. त्यांना वर्दी कार्ड दिले जाते. त्यांना बोनस, पेन्शन इतर सोयी सुविधा लागू नसतात. कारखाने बंद असल्याने त्यांची शंभर रुपयाची रोजीरोटी बुडाली. त्यांची कौटुंबिक उपासमार सुरू आहे. त्यामुळे त्यांना एका खासगी सावकाराकडे त्यांचे मंगळसूत्र गहाण ठेवावं लागलंय.
अशीच परिस्थिती नवीन विडी घरकुल येथील शांताबाई यांची आहे. त्यासुद्धा वयोवृद्ध आहेत. त्यांना त्यांची मुलं सांभाळत नाहीत. त्यांची दोन्ही मुलं वेगळ्या राहतात. पूर्वभागातील बहुतांश तेलुगू भाषिक कामगार विडी व यंत्रमाग उद्योगात गुंतली आहेत. महिला विडी उद्योगात तर पुरुष मंडळी यंत्रमाग उद्योगात आहेत. दोन्ही उद्योग पूर्णपणे बंद असल्यामुळे दोन्ही कामगारांची ओढाताण सुरू झाली आहे. ज्या ठिकाणी मोफत अन्नदान, तसेच धान्य वाटप सुरू आहे त्या ठिकाणी कामगार मदतीची याचना करीत आहे.
बुट्टी कारखाने सुरू
अधिकृत परवानाधारक विडी कारखाने बंद आहेत. त्यामुळे साठ हजार कामगार बसून आहेत. याचा फायदा गल्लीबोळांतील बिगर परवानाधारक छोटे-मोठे विडी उत्पादक उठवत आहेत. त्यांना बुट्टी कारखानदार म्हणतात. अधिकृत विडी कारखान्यात एक हजार विड्यामागे १८० रुपये इतकी मजुरी मिळते, तर बुट्टी कारखान्यात फक्त १०० ते १२० रुपये पर्यंत मजुरी मिळते. तरी कामगारांच्या हातात काम नसल्यामुळे महिला विडी कामगार बुट्टी कारखान्यात काम करीत आहेत. बुट्टी कारखान्यातून महिलांचे शोषण होत आहे. सध्या लॉकडाऊन असल्यामुळे या कारखानदारांना कारवाईची भीती आहे. त्यामुळे ते रात्री आठनंतर कारखाने सुरू ठेवतात. महिला विडी कामगार रात्री उशिरा तयार विड्या बुट्टी कारखान्यात देतात. त्यानंतर ते मजुरी घेऊन रात्री घरी परततात.