राकेश कदम, सोलापूर: मंगळवेढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजीत माने यांची कंट्रोल रूमला बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी परीविक्षाधीन पाेलिस नयाेमी साटम यांची नियुक्ती झाली आहे.
पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे पांडे यांनी याबाबत आदेश जारी केले. पोलीस निरीक्षक रणजीत माने यांच्याविरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे शहर समन्वयक नारायण गाेवे, तालुकाप्रमुख तुकाराम कुदळे, भाजपचे तालुकाध्यक्ष गाैरीशंकर बुरकूल, काँग्रेसचे शहराध्यक्ष राजाभाऊ चेळेकर, शिंदे गटाचे शहराध्यक्ष प्रतीक किल्लेदार, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चंद्रशेखर काेंडुभैरी, आरपीआय तालुकाध्यक्ष अशाेक शिवशरण, मनसे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत पवार, पँथर सेनेचे तालुकाध्यक्ष सिद्धार्थ लाेकरे, रासपचे शहराध्यक्ष राहुल हेंबाडे, प्रहार जनशक्तीचे तालुकाध्यक्ष राजकुमार स्वामी, काँग्रेसचे मारुती वाकडे यांनी पाेलीस अधीक्षक, पाेलीस महासंचालक यांच्याकडे तक्रार केली हाेती. मंगळवेढा तालुक्यातील अनेक गुन्हे घडले. या गुन्ह्यांच्या तपासाला विलंब लागत असल्याचे तक्रारदारांचे म्हणणे हाेते.
तक्रार करणाऱ्या मंडळींवर खंडणी व इतर तक्रारींवरुन गुन्हे दाखल आहेत. ही मंडळी बदनामीसाठी तक्रार करीत असल्याचे माने यांचे म्हणणे हाेते. या प्रकरणात विधान परिषदेचे विराेधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही उडी घेतली हाेती. दानवे यांनी पाेलिस महासंचालकांना पत्र पाठवून कार्यवाहीचा अहवाल पाठवा असे म्हटले हाेते. तक्रार करणाऱ्यांपैकी काहीजणांनी तक्रार मागे घेत असल्याचे कळविले हाेते. दरम्यान, पाेलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी माने यांची कंट्राेल रुमला बदली केली.