मंगळवेढा मार्गे पंढरपूर-विजापूर रेल्वेमार्ग योजनेस केंद्रीय रेल्वे मंत्रालय कार्यालयाकडून सकारात्मक प्रतिसाद देणारे व संबधित विभागास आदेशीत करणारे पत्र आ. समाधान आवताडे यांना प्राप्त झाले आहे. त्यामुळे ही महत्त्वाकांक्षी योजना कार्यान्वित होण्याच्या जनतेच्या आशा आ. समाधान आवताडे यांच्या प्रयत्नाने आता पल्लवित झाल्या आहेत.
तीर्थक्षेत्र पंढरपूरमध्ये अनेक वारकरी भाविक वर्षभरातील विविध वारी सोहळ्यानिमित्ताने कर्नाटक राज्यातून मंगळवेढामार्गे पंढरपूरला जातात. सन २०१३ साली सादर झालेल्या रेल्वे अर्थिक अंदाजपत्रकात पंढरपूर-मंगळवेढा-विजापूर या नवीन रेल्वे मार्गास मंजुरी दिली होती.
२०१८ साली या रेल्वेमार्गाचा सर्व्हे होऊन त्याचे बजेट केंद्रीय रेल्वे (पुणे विभाग) प्रशासनाकडे सादर केले. या सर्व्हेनुसार हे काम चालू होणे अपेक्षित होते. परंतु हा प्रकल्प स्थगित ठेवणेबाबतचे पत्र ६ ऑगस्ट २०१८ नुसार मध्य रेल्वे विभाग (पुणे) यांना कळविण्यात आले. सदर रेल्वे प्रकल्प कर्नाटक व महाराष्ट्र राज्याला जोडणारा असून यामुळे भाविक व शेतकरी यांना प्रवास वाहतूक अनुषंगाने दळणवळण सुविधा सुलभ आणि सोयीस्कर होणार आहे. त्यामुळे हा रेल्वेमार्ग येथील जनतेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. ही योजना मार्गी लागावी, यासाठी खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचे विशेष सहकार्य लाभत असल्याचे आ. आवताडे यांनी सांगितले.