राज्यात सत्तांतर झाल्यापासून सोलापूर जिल्ह्यातील राजकारण देखील वेगवेगळे वळण घेत आहे. महाविकास आघाडीची सत्ता असताना राष्ट्रवादीची ताकद वाढली होती. सोलापुरातील दिग्गज राजकीय नेते राष्ट्रवादीत जात होती. जुलैमध्ये राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर मात्र राष्ट्रवादीला गळती लागली आहे. अनेक दिग्गज नेत्यांनी राष्ट्रवादीत जाण्याचा मार्ग बदलला आहे. असाच एक मोठा राजकिय बॉम्ब मंगेश चिवटे यांनी रविवारी एका कार्यक्रमात फोडला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या जवळचे असलेले आणि मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी मोठा गौप्यस्फोट करत, महेश कोठेंना बाळासाहेबांच्या शिवसेनेतील आगामी आमदार महेश कोठे असा उल्लेख आपल्या भाषणात केला. यामुळे सोलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे. महेश कोठेंच्या प्रवेशानंतर राष्ट्रवादी भक्कम होईल असे मानले जात होते, पण मंगेश चिवटे यांच्या वक्तव्याने सोलापूरच्या राजकारणात वेगळे चित्र निर्माण झाले आहे.
काँग्रेसमध्ये अनेक वर्षे राजकारण व समाजकारण केलेले महेश कोठे हे नेहमी सोलापूरच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहिले आहेत. 2014 च्या विधानसभा निवडणूकित महेश कोठेंनी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला. 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने आमदारकीच तिकीट महेश कोठेंना न देता दिलीप माने यांना तिकीट देण्यात आलं होतं. त्यावेळी महेश कोठेंनी शिवसेनेत राहून शिवसेना उमेदवार दिलीप माने विरोधात अपक्ष निवडणूक लढवत शिवसेनेच्या दिलीप माने पेक्षा अधिक मत प्राप्त करून दाखवली होती.
शिवसेनेत घुसमट होत असल्यासारखे चित्र निर्माण झाल्याने अखेर महेश कोठेनी महाविकास आघाडीची सरकार असताना हातात घड्याळ बांधण्याचा निर्णय घेतला होता. शरद पवार यांनी देखील महेश कोठेंवर विश्वास दर्शवत आगामी होणाऱ्या सोलापूर महानगरपालिका निवडणुकची संपूर्ण जबाबदारी देखील दिली होती. महाविकास आघाडीची राज्यात सरकार असताना शरद पवार सोलापूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी महेश कोठेंच्या घरी शरद पवार आवर्जून गेले होते आणि भोजन देखील केले होते.
राष्ट्रवादीत महेश कोठेंसारखा मजबूत नेता आल्यावर सोलापूर महानगरपालिकेत राष्ट्रवादीचा महापौर होईल अशा वलग्ना अनेकदा केल्या गेल्या होत्या. राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकार आल्या पासून राष्ट्रवादीला एक प्रकारची मरगळ आली आहे.राष्ट्रवादीच्या बैठकांना अनेक दिग्गज नेत्यांनी पाठ फिरवण्यास सुरुवात केली. महेश कोठे देखील क्वचितच राष्ट्रवादीच्या बैठकांना उपस्थित होत होते. राष्ट्रवादी मधील अंतर्गत गटबाजीला कंटाळून माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांना घेऊन शिंदे गटात प्रवेश केला. महेश कोठे देखील शिंदे गटात जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती.
दरम्यान, सोलापुरात लिंगायत समाजाच्या एका कार्यक्रमात मंगेश चिवटे आले होते. मंगेश चिवटे हे एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. या कार्यक्रमात महेश कोठे, सुधीर खरटमलसह आदी नेते उपस्थित होते. मंगेश चिवटे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, माजी महापौर महेश अण्णा कोठे,बाळासाहेबांच्या शिवसेनेतील भावी आमदार आहेत,महेश अण्णा हे लवकरच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करतील.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील महेश कोठेंच्या प्रवेशाला हिरवा कंदील दाखवला आहे. असे वक्तव्य केल्याने एकच खळबळ उडाली आहे. महेश कोठेंच्या जाण्याची चर्चा सुरू असताना मंगेश चिवटे यांनी आपल्या भाषणातुन गौप्यस्फोट केला आहे.