करमाळा : तालुक्यातील सुशिक्षित बेकारांना रोजगार मिळवून देणारी मांगीची एम.आय.डी.सी़ लालफितीच्या कारभारात अडकली असून, जागा संपादन करून तब्बल १७ वर्षे झाली, पण अद्याप उद्योजकांना प्लॉटच वाटप न झाल्याने व एम.आय.डी. सी़ मध्ये पायाभूत सोयी-सुविधा न दिल्याने तालुक्याचा औद्योगिक विकास खुंटला आहे.करमाळा- अहमदनगर राज्य मार्गावरील मांगी गावच्या शिवारात १९९६ मध्ये राज्य शासनाच्या औद्योगिक विकास महामंडळामार्फत एम.आय.डी.सी़ मंजूर झाली.यासाठी ५० हेक्टर जमीन १९९७ मध्ये संपादित करण्यात आली. यामध्ये २२ हेक्टर क्षेत्र शासनाच्या मालकीचे तर उर्वरित २८ हेक्टर क्षेत्र शेतकर्यांच्या खाजगी मालकाचे संपादित करण्यात आले. संपूर्ण जमीन संपादित केल्यानंतर तब्बल १२ वर्षांनंतर प्लॉटचे मोजमाप करून प्लॉट पाडण्यात आले.या एम.आय.डी.सी़ मध्ये गेल्या चार वर्षांपूर्वी पहिल्या टप्प्यात अंतर्गत मुरूमाचे रस्ते,स्ट्रीट लाईट करण्यात आले, पण पाण्याची सोय झालेली नाही.शासकीय आय.टी.आय़,वसतिगृह व वीज मंडळाच्या १३२ के.व्ही.उपकेंद्रास जागा हे दोनच प्लॉट एम.आय.डी.सी़ ने वाटप केलेले असून त्या व्यतिरिक्त एकाही उद्योजकास प्लॉट वाटप झालेले नाही.मांगीच्या एम.आय.डी.सी. मध्ये प्लॉट घेऊन उद्योग सुरू करण्यासाठी शेकडो सुशिक्षित तरूण तयार आहेत. पण येथे पाणी, वीज,रस्ते आदी सोयी सुविधा दिल्या गेल्या नाहीत. वार्ताहर---------------------------------------------------------मांगी एम.आय.डी.सी़ मध्ये उद्योग उभा करण्यासाठी प्लॉट पाहिजे आहे.त्यासाठी महामंडळाच्या सोलापूर,सांगली या कार्यालयाशी वारंवार संपर्क करूनही प्रतिसाद मिळत नाही़ गेल्या दीड वर्षापासून ते सांगतात की ऑनलाईन अर्ज स्वीकारले जातील शिवाय दैनिक वर्तमान पत्रातून जाहिरात प्रसिध्दीनंतर प्लॅाट दिले जाणार आहेत एवढेच सांगितले जात आहे असे नवउद्योजक संजय घोलप यांनी सांगितले.
मांगीची एमआयडीसी लालफितीच्या कारभारात अडकली १७ वर्षांपासून उद्योजक प्लॉटपासून वंचित
By admin | Published: May 09, 2014 7:26 PM