अवकाळी पावसामुळे आंबा उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. दोन दिवस असलेले ढगाळ वातावरण आणि बुधवारी (दि. १७) पडलेल्या अवकाळी पावसामुळे माळशिरस तालुक्यात आंबा उत्पादक मात्र चांगलेच धास्तावले आहेत. वातावरण पूर्ववत झाले नाही तर नुकसानीच्या शक्यतेने त्यांना ग्रासले आहे. रब्बीचे पीकही या वातावरणामुळे अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
बुधवारी रात्री अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. यात रब्बी पिकांना मोठा फटका बसला. ज्वारी, गहू, हरभरा या महत्त्वाच्या पिकांसोबतच आंबे, द्राक्ष, डाळिंब, आदी फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. माळशिरस तालुक्यात अकलूज, माळीनगर, श्रीपूर, आदी भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे या भागातील शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला आहे.
कैऱ्या मिसळल्या मातीत
या वर्षी कलमी आंब्यांपेक्षा गावठी आंब्यांना मोहोर मोठ्या प्रमाणात भरला होता. वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावल्यामुळे आंबा फळझाडांची फुले गळली असून आंब्याचा मोहोर गळला आहे. काही ठिकाणी लहान कैऱ्या मातीत मिसळल्या. रब्बी पीक आणि फळबागांचे नुकसान झाले आहे. पिके ऐन काढणीत असताना अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे आंबा परत एकदा महाग होईल की काय, अशी चिंता लागली आहे.