पंढरपूर : आंबे (ता. पंढरपूर) येथील दर्लिंग देवाच्या वालगा प्रसादातून विषबाधा झालेल्या रुग्णांची आज पुणे आरोग्य उपसंचालिका डॉ. कांचन जगताप यांनी भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. विषबाधा कोणत्या कारणाने झाली याचा अहवाल लवकर मिळवून पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे सांगितले. आंबे (ता. पंढरपूर) येथील ग्रामस्थांना विषबाधेची लागण होऊन चार दिवस झाले तरीही रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. संबंधित रुग्ण उपचाराला प्रतिसाद देतात की नाही, विषबाधा होण्यामागची कारणे, उपजिल्हा रुग्णालयात व्यवस्थित उपचार मिळतात की नाही, पुरेसा औषधसाठा आहे का? या सर्व गोष्टींची तपासणी करण्यासाठी पुणे विभागीय आरोग्य उपसंचालिका डॉ. कांचन जगताप यांनी आज उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली. विषबाधा झाल्याने शुक्रवारी ४२ रुग्ण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत होते. त्यापैकी १८ रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने ते गावी परतले. तर शनिवारी पुन्हा आंबे येथील पाच नवीन रुग्णांना तसाच त्रास सुरु झाल्याने ते उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले आहेत. आ. भारत भालके व जिल्हा परिषद सभापती डॉ. निशिगंधा माळी व प्रदेश महिला काँग्रेस सदस्या मुबीना मुलाणी यांनी विषबाधा झालेल्या रुग्णांची भेट घेतली. आ. भारत भालके यांच्याकडे उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक पंकज गायकवाड यांनी उपजिल्हा रुग्णालयाच्या बेडची क्षमता वाढवावी, अशी मागणी केली. यावेळी आ. भारत भालके यांनी उपजिल्हा रुग्णालयाला आणखी १०० बेडची मंजुरी मिळाली असून त्यासाठी लवकर निधी मिळावा यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले.(प्रतिनिधी)