आप्पासाहेब पाटील, सोलापूर: अनंत काेटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय च्या जयघोषात बुधवारी श्री स्वामी समर्थ प्रकट दिन भक्तीभावात साजरा करण्यात आला. बुधवारी श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक दाखल झाले आहेत.
दरम्यान, स्वामी नामाच्या जयघोषाने मंदिराचा परिसर दुमदुमून गेला आहे. दुपारी १२ वाजता वटवृक्ष मंदिरात भाविकांच्या उपस्थितीत पाळणा व गुलालाचा कार्यक्रम झाला. दर्शंन रांगेतील भाविकांना उन्हाचा त्रास होवू नये यासाठी सावलीची व पाणी, शरबताची सोय केली आहे. समाधी मंदिरातही भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. अक्कलकोटप्रमाणेच सोलापूर शहरातील स्वामी मंदिरात ठिकठिकाणी भजन, पाळणा, गुलाल, पारायण व महाप्रसादाचे कार्यक्रम होत आहेत.
दरम्यान, वटवृक्ष मंदिरात पहाटे साडेपाच वाजता मंगल आरती झाली. त्यानंतर दर्शनासाठी मंदिरं खुलं झाले. पूजेनंतर मंदिरात आलेल्या दहा हजार भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. दुपारच्यावेळी भाविकांना दिलासा देण्यासाठी शरबत वाटप करण्यात आले. यंदाच्या वर्षी स्वामींना ड्रायफ्रुट लाडू, बेसन लाडू, कोकोनट चिक्की, चॉकलेट कुकीज व हँडमेड चॉकलेट अशा पंचपक्वान प्रसाद म्हणून अर्पण करण्यात आला.