कुर्डूवाडी : शहरातील गॅस गोडाऊन शेजारी सुरू असलेल्या मन्ना जागार अड्ड्यावर धाड टाकून, पोलिसांनी पाच जणांना पकडून कारवाई केली. जुगारातील दोन हजार ८०० रूपये जप्त केले. या प्रकरणी कुर्डूवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
दर्शन शर्मा,यश दाभाडे,विकास इंगोले,प्रवीण इंगोले,सोमेश राजू कांबळे (सर्व रा. कुर्डूवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की ऑपरेशन ऑल आऊट दरम्यान खासगी वाहनाने पेट्रोलिंग सुरू होती. दरम्यान गोपनीय बातमीदाराकडून कुर्डूवाडी शहरातील गॅस गोडाऊन शेजारी पत्रा शेडच्या आडोशाला काही इसम मन्ना नावाचा पत्त्याचा जुगार खेळत असल्याची माहिती समजली. पोलिस घटनास्थळी गेल्यानंतर त्यांना पाचजण गोलाकार बसून पत्त्याची पाने टाकून मन्ना नावाचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी तात्काळ धाड टाकून पाच जणांना पकडले. जुगारात पैसे लावण्यात आले होते. पोलिसांनी पत्त्याचा डाव व रोख २ हजार ८०० रुपये जप्त करुन पाच जणांवर कारवाई केली. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल सागर रामदास भोगे यांनी कुर्डूवाडी पोलिसांत फिर्याद दिली आहे.