सोलापूर : मनोरमा साहित्य मंडळीच्या राज्यस्तरीय साहित्य पुरस्काराची घोषणा झाली आहे. यावर्षी अॅड. लखनसिंह कटरे, प्रा. प्रमोद गारोडे, प्रा. आनंद मेणसे, संग्राम गायकवाड यांच्यासह यांच्यासह दहा साहित्यिकांना पुरस्कार देण्यात येणार आहेत. रविवार १६ जून रोजी सायंकाळी ५ वाजता डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात पुरस्काराचे वितरण होणार आहे, अशी माहिती बँकेचे चेअरमन श्रीकांत मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मनोरमा बँक, मनोरमा मल्टिस्टेट पुरस्कृत मनोरमा साहित्य पुरस्कार, स.रा. मोरे ग्रंथालयातर्फे मनोरमा साहित्य सेवा पुरस्कार, विशेष पुरस्कार असे एकूण १४ जणांना जाहीर झाला आहे. त्यामध्ये गोंदिया येथील साहित्यिक अॅड. लखनसिंह कटरे, अमरावती येथील प्रा. प्रमोद गारोडे, बेळगाव येथील प्रा. आनंद मेणसे, सोलापूर येथील संग्राम गायकवाड यांना मनोरमा बँक साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे.
मनोरमा मल्टिस्टेट पुरस्कृत मनोरमा साहित्य पुरस्कार हा ठाणे येथील साहित्यिक अॅड. सुजाता जाधव, छत्रपती संभाजीनगर येथील साहित्यिक डॉ. ललित अधाने, पुणे येथील साहित्यिक डॉ. संदिप सांगळे यांना जाहीर झाला आहे. स.रा. मोरे ग्रंथालयातर्फे मनोरमा साहित्य सेवा पुरस्कार सोलापूर येथील साहित्यिक सुनेत्रा पंडित, बेळगाव येथील प्रतापसिंह चव्हाण, गोवा येथील चित्रा क्षीरसागर यांना जाहीर झाला आहे.
ठाणे येथील साहित्यिक अशोक समेळ आणि दादर येथील मुधरा वेलणकर यांचा विशेष पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येणार आहे. तसेच सोलापूर येथील अस्मिता गायकवाड, डॉ. कविता मुरुमकर यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.