सोलापूर : अनाथ मुलांकरिता अनाथालये आहेत़ वृद्धांकरिता वृद्धाश्रम आहेत. मानसिक संतुलन बिघडलेल्या बेघर, बेवारस अशा मनोरुग्णांचा वाली कोण, या प्रश्नातून पूर्व भागातील एका युवकाने स्वत:हून उत्तर शोधले़ अन् मनोरुग्णांच्या सेवेला नि:स्वार्थपणे स्वत:ला वाहून घेतले.
मोहन तलकोकुल हे गेंट्याल चौकातील राठी यंत्रमाग फॅक्टरीत मुनीम म्हणून काम करतात. त्यांची घरची स्थिती देखील बेताचीच आहे़ महिन्याकाठी त्याला दहा हजार रुपये पगार मिळतो़ या पगारातून ते वीस ते पंचवीस टक्के रक्कम मनोरुग्णांच्या सेवेला खर्च करतात़ मनोरुग्णांशी संवाद साधणे कठीण असत़े़ अशात ते बिनधास्त मनोरुग्णांना बोलते करतात. त्यांच्या अडचणी जाणून घेतात. बहुतांश मनोरुग्ण बोलत नाहीत़ एका ठिकाणी थांबत नाहीत़ अशोक चौक, गेंट्याल चौक, सिव्हिल चौक, कन्ना चौक, रेल्वे स्टेशन, बस स्टँड परिसर अशा विविध ठिकाणी जाऊन भटकणाºया रुग्णांची विचारपूस करून त्यांना गरजेच्या वस्तू पोहोच करतात. शिवाय त्यांची दाढी, कटींग अन् कपड्यांचीही ते काळजी घेतात.
सध्या थंडी जोरात आहे़ या थंडीत बेघर रुग्णांना असह्य यातना होतात़ अशात त्यांच्या ठिकाणी त्यांना पांघरुण देणे़ डोक्यावर टोपी घालणे़ त्यांना ताप आल्यास त्यांना गोळ्या-औषध देणे, गरज भासली तर डॉक्टरांकडे घेऊन जाणे अशी कामे मोहन नियमित करतात़ जखमी मनोरुग्णांना सिव्हिलमध्ये दाखल करून त्यांच्यावर काळजीपूर्वक उपचार करतो़ या मनोरुग्णांना मोहनची इतकी सवय झाली आहे की, दर आठ-दहा दिवसांनंतर मोहनला शोधत मनोरुग्ण त्यांच्या फॅक्टरीकडे येतात़ मोहनच्या कामात त्याचे मित्र हरीश चाटला, मोहन वड्डेपल्ली, महेश वनमुर्गी, महेश चिम्मन यांच्यासह इतर सहकारी मदत करतात़
शिक्षण केवळ सातवी...- मोहन सातवी शिकलेला आहे़ मार्कंडेय जनसेवा अर्थात एमजे प्रथम मानवसेवा या संस्थेद्वारे तो मनोरुग्णांची सेवा करतोय़ मनोरुग्ण अडचणीत असल्यास सर्वप्रथम आपण त्यांच्या मदतीला जाऊ, या उद्देशाने तो संस्थेच्या नावात प्रथम मानवसेवा असा उल्लेख केला़ त्याला दोन मुले आहेत़ आई सावित्रीबाई या विडी कामगार तर वडील नागेश तलकोकूल हे यंत्रमाग कामगार आहेत़ समाजात फिरताना त्याला रस्त्यावर भटकणारे मनोरुग्ण दिसायचे़ त्यांना पाहून तो हळवा होत होता़ त्यांच्या मनात रुग्णांबद्दल काळजी वाटू लागली़ मित्रांशी चर्चा करून मनोरुग्णांची सेवा करण्याचे सामाजिक व्रत त्याने स्वीकारले. मनोरुग्णांना समजून घेणारा कोणी तरी असावा, अशी त्याची श्रद्धा आहे़ रुग्णांना मानसिक आधार मिळाल्यास ते बरे होऊ शकतात़ ते सामान्य जीवन जगू शकतात़ त्यांना समाजाकडून चांगली वागणूक मिळाली पाहिजे, असे मोहनला वाटते़