दोन दिवसांपूर्वी अक्कलकोट बुधवार पेठ येथील स्वामी समर्थ समाधी मठाजवळ एका ७० वर्षीय अनाथ महिलेचा मृत्यू झाला. ती अनेक वर्षांपासून या ठिकाणी भिक्षा मागून गुजराण करीत होती. तिचा अचानकपणे मृत्यू झाल्याने समाजासमोर आर्थिक परिश्रमाचे प्रश्न निर्माण झाले होते. तेव्हा लहुजी शक्तीसेना अध्यक्ष वसंत देढे व रॉबिड हूड आर्मीचे रशीद खिस्तके, विक्रांत अळोळी, राम लोणारी, आकाश अळोळी, गोटू गवंडी, अनिल किलजे आदींनी तिच्याकडे शोध घेतले असता, ५ हजार ६०० रुपये रोख निघाले. तेव्हा खर्चाचा प्रश्न मिटल्याने कोणाकडेही लोकवर्गणी न करता, अंत्यविधीसाठी लागणारे सर्व साहित्य, घेऊन जाण्यासाठी लागणारे वाहन आधी प्रकारची सोय करण्यात आली. त्यानंतर तिच्यावर हिंदू स्मशानभूमी येथे विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले.
---
राहिलेल्या रकमेतून अन्नदान
तिच्याकडे असलेल्या ५६०० रुपयांपैकी खर्च वजा राहिलेल्या रकमेतून अन्नदान करण्यात येणार आहे. शिवाय ती मृत्यूच्या पश्चातही कोणाची देणेकरी राहिली नाही. हे निराश्रित महिलेच्या बाबतीत विशेष म्हणावे लागेल. तिचे ना गाव, नाव, ना नातेवाईक कोणीच नसताना पुढे येऊन रीतिरिवाजाप्रमाणे अंत्यविधी करणे म्हणजे सामाजिक कार्याला सलाम करणारी घटना आहे. या कार्यामुळे आजही समाजात माणुसकी शिल्लक असल्याचे अक्कलकोटकरांनी दाखवून दिले आहे.
----
फोटो : २७ अक्कलकोट १
अक्कलकोट बुधवार पेठ येथील समाधी मठाजवळ भिक्षा मागून खाणाऱ्या एका बेवारस मृत महिलेचे अंत्यविधी करताना वसंत देढे, रॉबिडचे रशीद खिस्तके आदी दिसत आहेत.