दक्षिण सोलापूर : काँग्रेसच्या दारुण पराभवानंतर दक्षिण सोलापूर तालुक्यात पडझड सुरू झाली आहे़ आनंदकुमार अंत्रोळीकर यांच्यानंतर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके यांनीही सोमवारी पदाचा राजीनामा दिला़ हे लोण तालुक्यात पसरत चालले आहे़ संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष आनंदकुमार अंत्रोळीकर यांनी काँग्रेस नेतृत्वावर टीकास्त्र सोडत पक्षाच्या अधोगतीस जबाबदार धरले आणि नैतिक जबाबदारी स्वीकारून स्वत:ही समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला़ प्रामाणिक कार्यकर्त्यांचा सन्मान नाही़ ही त्यांनी केलेली टिप्पणी बोलकी आहे़ सोमवारी सकाळीच शेळके यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला़ राजीनामा देताना शेळके यांनी कोणाला जबाबदार धरले नाही; मात्र अंत्रोळीकर यांनी नेतृत्वावर आक्षेप घेतला आहे़ माळकवठे हे गाव काँग्रेसचा बालेकिल्ला असताना भाजपला मताधिक्य मिळाले़ त्यामुळे येथील सरपंच पंचाक्षरी स्वामी व्यथित झाले आहेत़ त्यांनीही सरपंचपदाचा राजीनामा देण्याची तयारी केली आहे़ सुशीलकुमार शिंदे यांना मानणारा तालुक्यात मोठा वर्ग आहे़ या सर्वांनाच आता काँग्रेसमध्ये राहणे अडचणीचे वाटत असल्याने त्यांनी पक्षत्यागाची आणि असतील त्या पदाचा त्याग करण्याची तयारी सुरू केली आहे़ संघटित राजीनामे द्यायचे की सुशीलकुमार शिंदे यांना भेटून आपल्या व्यथा मांडायच्या यावर खल सुरू आहे़ येत्या काही दिवसांत राजीनाम्याचे लोण ग्रामीण भागापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे़