सोलापूर : सोलापुरात आज दुपारी एकच्या सुमारासमराठा क्रांति आक्रोश मोर्चा सुरू झाला आहे. आत्ताच्या स्थितीत मोर्चाचं पहिले टोक छत्रपती शिवाजी महाराज चौकात तर शेवटचे टोक छत्रपती संभाजी महाराज चौकातच आहे. दोन्ही बाजून तगडा पोलिस बंदोबस्त आहे.
मोर्चात तळपत्या उन्हात आणि प्रचंड उकाडा असूनही युवक आणि महिलांची संख्या मोठी आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या विरोधात घोषणाबाजी सुरू आहे. आरक्षण मिळणे हा मराठा समाजाचा हक्क आहे. शासन कोणतीही मेहरबानी करत नाही अशा घोषणा यावेळी देण्यात येत आहेत.
छत्रपती संभाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाणारा रस्ता आणि या रस्त्याला मिळणारे इतर सर्व रस्ते पोलिसांनी बॅरिकॅटीग टाकून बंद केले आहेत. तर शहरात येणाऱ्या सातही नाक्यांवर तगडा पोलिस बंदोबस्त असून मोर्चासाठी येणारी वाहने तिथेच घडवली जात आहेत.
माजी आमदार नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघाला आहे. मोर्चाकडे येणाऱ्या अनेक गाड्या रोखल्या असल्या तरी अनेक जण मोर्चात सहभागी झाले आहेत. मोर्चा शांततेत आणि शिस्तबद्ध सुरू असून कोणत्याही प्रकारच्या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात येत आहे.