भरसभेत उपमुख्यमंत्री अजित पवारांना मराठा बांधवांनी दाखविले काळे झेंडे!
By रवींद्र देशमुख | Published: October 23, 2023 03:16 PM2023-10-23T15:16:30+5:302023-10-23T15:17:07+5:30
पोलिसांनी आंदोलन करताना ताब्यात घेतल्यानंतर कार्यक्रम सुरळीत पार पडला
सोलापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार हे सोमवारी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. माढा तालुक्यातील पिंपळनेर येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगार शुभारंभ कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती लावली. या कार्यक्रमाप्रसंगी काही मराठा समाज बांधवांनी अजित पवार यांना काळे झेंडे दाखवून सरकारचा निषेध नोंदविला.
त्यामुळे काही काळ सभेच्या ठिकाणी गोंधळ उडाला होता. मात्र पोलिसांनी आंदोलन करताना ताब्यात घेतल्यानंतर कार्यक्रम सुरळीत पार पडला. मराठा आरक्षण मिळेपर्यंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जिल्ह्यात येऊ देणार नाही. तरीही ते आल्यास मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागेल, अशा आशयाचे पत्र माढा सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने माढा पोलिसांना दिले होते. त्यामुळे पिंपळनेर येथील कार्यक्रमाच्या ठिकाणी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाषणाला सुरुवात केल्यानंतर एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत तरुणांकडून काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे काही वेळ गोंधळ उडाला. मात्र पोलिसांनी तात्काळ त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर आपल्या भाषणामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे सांगितले.