आप्पासाहेब पाटील, सोलापूर : मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी व जालना जिल्ह्यात झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेध करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी, मोहोळ, मोडनिंब, करमाळा, वडाळा, नान्नज, पंढरपूर, सांगोला, अक्कलकोट आदी तालुक्यात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी शिंदे, फडणवीस, पवार सरकारविराेधात घोषणाबाजी करण्यात आली.
टेंभुर्णीत कडकडीत बंद
टेंभुर्णी येथे कडकडीत बंद पाळून जालना जिल्ह्यात झालेल्या लाठी हल्ल्याचा निषेध करण्यात आला. यासाठी येथील करमाळा चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर हजारो लोक एकत्र आले होते.
सोलापूर-पुणे महामार्ग रोखला
सकल मराठा समाजाच्यावतीने मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी सोलापूर-पुणे महामार्ग रोखला होता. याचशिवाय सोलापूर-हैद्राबाद महामार्गावरही रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
मोहोळ-विजापूर रोडवर आंदोलन
सकल मराठा समाज कुरुलच्या वतीने जालन्यात झालेल्या लाठीचार्ज विरोधात मोहोळ - कुरुल - विजयपूर नॅशनल हायवेवर रस्ता रोको करून निवेदन पोलिसांना निवेदन देण्यात आले.
मोडनिंब कडकडीत बंद
मोडनिंब येथे सकल मराठा समाजाच्या वतीने मोडनिंब कडकडीत बंद ठेवण्यात आले. यावेळी रविवारी सकाळी दहा वाजता मोडनिंब गावातून मूक मोर्चा काढून मराठा समाजावर केलेल्या मारहाणीचा निषेध व्यक्त करण्यात आला.
अहमदनगर-टेभूर्णी रस्त्यावर आंदोलन
करमाळयात अहमदनगर-टेभूर्णी राज्य मार्गावर बायपास चौकात सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन करून तहसिलदारांना निवेदन दिले. रास्ता रोको आंदोलनामुळे शेकडो वाहनांच्या रांगा लागल्या.
कुर्डूवाडीत कडकडीत बंद
कुर्डूवाडीत सकल मराठा समाजाच्या वतीने बायपास रोडवर संभाजी महाराज चौकात एक तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्याचबरोबर शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे.
पंढरपूर-कराड रोडवर आंदोलन
सकल मराठा समाज महूदच्या वतीने पंढरपूर कराड रोडवरील महूद मुख्य चौकात रस्ता रोको आंदोलन करून पोलीस प्रशासनाचे तहसीलदार यांना निवेदन दिले.
घेरडी गावात कडकडीत बंद
जालना जिल्ह्यातील अंतरवाली (सराटी ) येथे मराठा समाजावर पोलीस प्रशासनाकडून अमानुष झालेल्या लाठीचार्ज प्रकरणाचा निषेध व्यक्त करण्यासाठी सांगोला तालुक्यातील घेरडी गावात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे, तसेच सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने सांगोला महात्मा फुले चौकातून निषेध मोर्चा काढून रस्ता रोको आंदोलन सुरू आहे.