मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी मराठा समाजाकडून अनेक वर्षांपासून होत आहे. आजच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. मराठा समाजातील कार्यकर्ते व आरक्षण प्रश्नावर लढा देणारे क्रांती मोर्चाचे पदाधिकारी पंढरपुरात दाखल झाले होते. निकाल मराठा समाजाच्या बाजूने लागेल म्हणून काही कार्यकर्त्यांनी जल्लोषाची तयारी केली होती.
परंतु सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायदा रद्द केल्याचा निर्णय बुधवारी दिला. न्यायालयाच्या निर्णयानंतर मराठा समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी पंढरपुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सरकारच्या विरोधात अर्धनग्न व मुंडण आंदोलन करुन निषेध केला.
या आंदोलनामध्ये मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक महेश डोंगरे, रामभाऊ गायकवाड, संभाजी ब्रिगेडचे किरण घाडगे, स्वागत कदम, शशिकांत पाटील, धनाजी साखळकर, संदीप मुटकुळे, संतोष कवडे आदींसह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
राज्यातील मंत्र्यांना फिरू देणार नाही
राज्यातील मंत्री, आमदार यांनी मराठा समाजाची योग्य भूमिका मांडली नाही. त्यामुळे राज्यातील एकाही मंत्र्यांना व आमदार, खासदारांना रस्त्यावरुन फिरू देणार नाही. प्रसंगी त्यांच्या गाड्या फोडू असा इशारा यावेळी मराठा आंदोलक कार्यकर्त्यांनी दिला.
------
सडेतोड उत्तर देऊ: गायकवाड
राज्यातील अतिशय संवेदनशील राजकीय आणि सामाजिक मुद्दा असलेल्या मराठा आरक्षणा प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयानं महत्त्वाचा निकाल दिला आहे. राज्य सरकारनं तयार केलेला मराठा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला आहे. सरकार आरक्षणाच्यावतीने बाजू कमी पडल्याचा आरोप पंढरपुरातील समाज बांधवांनी केला आहे. यावेळी संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी आम्ही मंत्री, आमदार, खासदार यांच्या गाड्या फोडू, असा इशारा दिला, आमच्या ५६ मुलांनी आरक्षणासाठी बलिदान दिले, अनेक युवक तुरुंगात आहेत,आणि सरकार गप्प आहे, हा आमच्यावर मोठा अन्याय असून आम्ही याला आम्ही सडेतोड उत्तर देऊ असे मराठा क्रांती मोर्चा समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी म्हटले आहे.
फोटो :::::::::::::
पंढरपुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सरकारच्या विरोधात अर्धनग्न व मुंडण आंदोलन करताना मराठा समाजातील तरुण.