सोलापूर : काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांनी मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला अंतरावली सराटी येथे जाऊन पाठिंबा दिलेला नाही. त्यांच्याकडून मराठा समाजाची फसवणूक झाली, असा आरोप शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी मंगळवारी केला.
अमोल शिंदे म्हणाले, खासदार प्रणिती शिंदे या मराठा समाजाच्या मतांवरच निवडून आल्या. मनोज जरांगे-पाटील यांनी नुकतेच अंतरावली सराटी येथे आरक्षणासाठी उपोषण केले. राज्यातील अनेक नेते त्यांना भेटून आले. पण खासदार शिंदे आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गेल्या नाहीत. लोकसभा निवडणुकीत जरांगे-पाटील सोलापुरात आले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी खासदार शिंदे यांची धडपड सुरू होती.
आता मराठा समाजाच्या आंदोलनाच्या काळात त्या जरांगे-पाटील यांना भेटायला तयार नाहीत. वास्तविक त्यांनी अंतरावली सराटी येथे जाऊन आपली भूमिका जाहीर करणे आवश्यक होते. समाजाला पाठिंबा देणे आवश्यक होते. समाजाने आता वेळीच सावध झाले पाहिजे, असेही अमोल शिंदे म्हणाले.