सोलापूर : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण स्वीकारले नाही. त्यामुळे समाज अस्वस्थ आहे. कायद्याच्या चाैकटीत राहून मराठा समाजाला आरक्षण कसे मिळेल यासाठी प्रत्येक जिल्ह्याचा दौरा सुरू केला असून, तज्ज्ञ मंडळींशी सल्लामसलत करत आहे, अशी माहिती खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
छत्रपती शाहू महाराज यांचा आशीर्वाद घेऊन खासदार छत्रपती संभाजी महाराज यांनी कोल्हापूरपासून महाराष्ट्र दाैऱ्याला सुरुवात केली आहे. सोमवारी सायंकाळी ते सोलापुरात आले. येथील अनेक मान्यवरांशी भेटून त्यांनी चर्चा केली व त्यानंतर शासकीय विश्रामधामवर पत्रकारांशी संवाद साधला. मराठा आरक्षण कायद्याच्या चौकटीत का टिकू शकले नाही. यात कोणाचे काय चुकले? कोणाचे बरोबर आहे? यात मला पडायचे नाही. पण आरक्षण न मिळाल्याने मराठा समाज अस्वस्थ आहे. समाजासाठी मी हा दौरा सुरू केला आहे? यात कोणतेही राजकारण नाही. कायद्याच्या चौकटीत बसवून समाजाला आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी राज्यातील अनेक मान्यवरांशी मी याबाबत चर्चा करणार आहे. त्यानंतर २७ मे रोजी आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन दौऱ्यात आलेल्या सूचना व आरक्षणाचे पर्याय त्यांच्यासमोर मांडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मराठा समाजातील राज्यसेवा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना नियुक्त्या देण्यात येत नसल्याचे निदर्शनाला आणल्यावर खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी सप्टेंबर २००९ पूर्वी राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या मराठा समाजातील उमेदवरांना नियुक्त्या दिल्या पाहिजेत, असे सांगितले. यावेळी आमदार सुभाष देशमुख सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार, मराठा क्रांती मोर्चाचे श्रीकांत घाडगे, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, नगरसेवक विनोद भोसले, शिवसेनेचे बाळासाहेब गायकवाड, राजन जाधव, शिरीष जगदाळे, अमोल जाधव, अजय सोमदळे, शशी कांचन, श्रेयस माने आदी उपस्थित होते.
...तर मी राजीनामा देईन
माझा हा दौरा राज्य किंवा केंद्र सरकारच्या विरोधात नाही. मराठा आरक्षण कायद्याच्या चौकटीत कसे बसेल याबाबत प्रत्येक जिल्ह्यातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणार आहे. माझ्यासाठी समाज महत्त्वाचा आहे. मी राजीनामा दिल्याने मराठा आरक्षण मिळत असेल तर लगेच राजीनामा देतो, असे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले. मी खासदार झाल्याने शिवशाहीसंबंधी अनेक चांगल्या गोष्टी दिल्लीत सुरू झाल्या. किल्ले संवर्धनाचे प्रश्न सुटल्याचेही ते म्हणाले.