राकेश कदम, सोलापूर: शहर आणि परिसरात मराठा आरक्षण आंदोलन तीव्र होत आहे. देगाव येथील ग्रामस्थांनी बुधवारी सकाळी दहा वाजता सोलापूर मंगळवेढा मार्गावर ठिय्या मारून निदर्शने केली. सोलापूर मंगळवेढा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
देगाव येथील ग्रामस्थांनी मनोज जरांगे पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. सरकारकडून मराठा आरक्षणाची दखल घेतली जात नाही. त्यामुळे बुधवारपासून तीव्र आंदोलन करू असा इशारा ग्रामस्थांनी दिला होता. सकल मराठा समाजाच्या नेतृत्वाखाली बुधवारी सकाळी ग्रामस्थ रस्त्यावर उतरले. 'एक मराठा लाख मराठा', 'करेंगे या मरेंगे हम सब जरांगे ', अशा घोषणा ग्रामस्थ देऊ लागले. आंदोलन सुरू झाल्यानंतर अर्धा तासांनी पोलीस यंत्रणा पोहोचली. ग्रामस्थ हटायला तयार नव्हते.
सकल मराठा समाजाचे माऊली पवार म्हणाले, राज्य सरकार आंदोलकांच्या मागण्या पूर्ण करण्याऐवजी आंदोलकांना धमक्या देऊन आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करीत आहे. या विरुद्ध गावागावात रोष व्यक्त होत आहे.