सोलापूर : मनोज जरांगे-पाटील यांचे आंतरवली सराटी येथे उपोषण सुरू आहे, एकही आमदार त्यांच्याकडे गेला नाही. मराठ्यांना ५० टक्क्यांच्या आत कुणबीतून आरक्षण मिळवण्यासाठी विधानसभेत आवाज उठवा अशी मागणी करीत सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी शहरातील आमदारांच्या निवास्थानासमोर ठिय्या आंदोलन केले. माजी पालकमंत्री, सहकार मंत्री व कॉंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या निवासस्थानासमोर जाऊन घोषणाबाजी केली.
सकल मराठा समाज सोलापूर जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांनी प्रथमत: माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या काळजापूर मारूती मंदिर जवळील घरासमोर ठिय्या मांडला. एक मराठा लाख मराठा म्हणत त्यांनी घोषणाबाजी करण्यास सुरूवात केली. विजयकुमार देशमुख हे बाहेर आले, त्यांनी कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. समन्वयक माऊली पवार यांनी मनोज जरांगे-पाटील हे गेल्या सहा दिवसापासून उपोषण करीत आहेत. त्यांची तबियत बिघडली आहे, त्यांना वाचवा. मराठा समाजाच्या मागण्या मान्य करा अशी विनंती केली. विजयकुमार देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केल्या, त्यांनी कार्यकर्त्यांना आश्वासन दिले.
तेथून हा मोर्चा आमदार प्रणिती शिंदे यांच्या सात रस्ता येथील निवास्थानी पोहचला, तेथे ठिय्या आंदोलन केले. विरोध पक्षाच्या आमदारांनी आवाज उठवला पाहिजे. असे म्हणत घोषणाबाजी केली. आमदार प्रणिती शिंदे यांना फोन करून तो स्पिकरवर सर्वांना ऐकवण्यात आला. प्रणिती शिंदे यांनी मी व कॉंग्रेसचे सर्व आमदार तुमच्या बाजूने आहेत असे अश्वासन दिले. होटगी रोडवरील सुभाष देशमुख यांच्या निवास्थानासमोरही ठिय्या आंदोलन करण्यात आले, त्यांनीही मोबाईलवर अश्वासन दिले. त्यानंतर आंदोलनकर्ते निघून गेले.