सोलापूर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सोलापूर शहरात सोमवारी बंद पाळण्यात आला़ या बंदला १०० टक्के प्रतिसाद मिळत असला तरी सोलापूर महानगरपालिका परिवहन सेवेने बससेवा, एसटी सेवा, खासगी वाहतुक बंदने सर्वसामान्यांच्या प्रवासाचे सोमवारी दिवसभर हाल झाले आहेत.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने सोमवारी सोलापूर बंदची हाक दिली होती़ सकाळपासूनच शिवाजी चौकातील दुकाने, हॉटेल्स, एसटी सेवा, बस सेवा, खासगी वाहने, रिक्षा, टमटम आदी वाहतुक १०० टक्के बंद ठेवण्यात आली होती़ त्यामुळे नोकरदार, सर्वसामान्यांना या ठिकाणाहुन त्या ठिकाणी जाण्यासाठी मोठी गैरसोय झाली.
मराठा आरक्षण दरम्यान जिल्ह्यात ठिकठिकाणी झालेल्या आंदोलनावेळी जिल्ह्यातील १५७ एसटी बसची तोडफोड करण्यात आली होती़ त्यामुळे आगार व्यवस्थापकांनी सोमवारी बंदच्या दिवशी एकही एसटी बस सुरू ठेवणार नसल्याचे सांगितले़ शिवाय परिवहन व्यवस्थापक अशोक मल्लाव यांनी सुरक्षतेच्या कारणावरून शहरातील एकाही मार्गावर बससेवा देण्यात येणार नसल्याचे सांगितले होते़ त्यामुळे सोमवारी एकाही मार्गावर एसटी बस व परिवहनची बस सेवा सुरू करण्यात आली नव्हती़ त्यामुळे नोकरदारांना त्याचा चांगलाच फटका बसला़