सोलापूर : राज्यातील पहिला मराठा जातीचा दाखला (एसईबीसी) दक्षिण सोलापूर तालुक्यातील नांदणी येथील अवधूत ज्योतीराम पवार या विद्यार्थ्यासाठी सोलापूर प्रांत कार्यालयाने वितरित केला.
मराठा समाजाला आरक्षण जाहीर झाल्यानंतर एसईबीसीचा दाखला काढण्याची व्यवस्था सेतू कार्यालयात करण्यात आली आहे. यासाठी १0 डिसेंबरच्या सायंकाळी पाच वाजेपासून याबाबतची शासकीय लिंक सुरू करण्यात आली आहे. ज्योतीराम पवार हे प्रांत कार्यालयात सेवेत आहेत. त्यांचा मुलगा अवधूत हा इंडियन मॉडेल स्कूलमध्ये मोठ्या गटात शिकत आहे. मुलाच्या पुढील शिक्षणासाठी ज्योतीराम यांनी ११ डिसेंबर रोजी आवश्यक ती कागदपत्रे व पुरावे देऊन सेतूमध्ये अर्ज दाखल केला होता. त्या अर्जावर सेतू कार्यालयाने तातडीने अंमलबजावणी करून तपासणी करून घेतली.
तपासणी पूर्ण झाल्यावर सेतूच्या आॅनलाईन सेवेवर पहिला दाखला तयार करण्यात आला. दक्षिण सोलापूरच्या प्रांत अधिकारी ज्योती पाटील यांच्या हस्ते पवार यांना दाखला वितरित करण्यात आला. यावेळी नायब तहसीलदार प्रवीण घम, छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष योगेश पवार, गणेश शितोळे, सेतू कार्यालयाचे गजेंद्र गायकवाड उपस्थित होते.
दाखल्यासाठी हे करा- मराठा एसईबीसी दाखला काढण्यासाठी पुढील कागदपत्रे हवी आहेत. १९६७ चा पुरावा, त्यासाठी वडील, काका किंवा आत्याचा जन्म किंवा शाळा सोडल्याचा दाखला. उमेदवाराची कागदपत्रे: ज्याला दाखला हवा त्याचा जन्म किंवा शाळा सोडल्याचा दाखला, आधारची छायांकित प्रत किंवा अन्य ओळखपत्र, रेशनकार्ड. १९६७ च्या जन्मदाखल्यावर ज्या गावाची नोंद असेल त्या गावच्या संबंधित तहसील किंवा सेतू कार्यालयात या दाखल्यासाठी अर्ज करावा लागणार आहे.