मंगळवेढा/मल्लिकार्जुन देशमुखे
राज्य शासनाचे मराठा आरक्षणप्रश्नाकडे पुर्णपणे दुर्लक्ष केले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाज रस्त्यावर आल्याशिवाय महाविकास आघाडी सरकारचे ही डोळे उघडणार नाही. राज्यात सोलापूर येथे पहिला मोर्चा असून हा मोर्चा राज्यात मराठा समाजाचा आक्रमक मोर्चा असेल.लोकशाही पद्धतीने मराठा समाज आपला लढा उभारणार आहे. यासाठी सर्वांनी एकत्र यावे, अशी हाक अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिली
मराठा महासंघाचे संस्थापक आमदार स्व. अण्णासाहेब पाटील याचे चिरंजीव व माथाडी कामगार नेते तथा अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील हे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून समाज नेत्यांच्या भेटीगाठीसाठी व सोलापूर येथे होणाऱ्या मराठा क्रांती संघर्ष मोर्चाची दिशा ठरविण्याकरिता जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. सोमवारी त्यांनी मंगळवेढा येथे मराठा क्रांती मोर्चाच्या नेत्यांसोबत बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते.
मराठा समाजाने राज्य शासनावर आपला दबाव ठेवल्याशिवाय आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही. कोर्टामध्ये मराठा समाजाची बाजू मांडण्यास राज्य सरकार अपयशी ठरले आहे. सरकारने मराठा समाजाची सक्षम बाजू मांडली असती तर मराठा आरक्षण कोर्टात टिकले असते .मात्र सरकारलाच मराठ्यांना आरक्षण द्यायचे नाही म्हणून त्यांनी आरक्षणाची बाजू सक्षम मांडली नाही, असा आरोपही पाटील यांनी केला.
पुढे बोलताना नरेंद्र पाटील म्हणाले की मराठा समाजातील नेत्यांनी माझ्यापुढे पक्षाचे लेबल लावून येऊ नये. ज्यांना राजकारण करायचे आहे त्यांनी खुशाल करावे. पण त्यात समाजाचा विचार करावा. मी फक्त मराठा आहे असं समजून तुम्ही मोर्चात सहभागी व्हा. राजकारणाच्या वेळेला राजकारण करा. मराठा आंदोलनाला राजकारणाची जोड देऊ नका. पक्षविरहित आंदोलन झालं पाहिजे असे मतही पाटील यांनी व्यक्त केले. सोलापूर जिल्ह्यातील मराठा समाज सर्व मोर्चात अग्रेसर होता. ५८ मोर्चे निघाले त्यावेळी जी भूमिका सर्वांची होती तीच भूमिका आता देखील असावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी आ समाधान आवताडे, दामाजी कारखान्याचे माजी व्हा चेअरमन रामचंद्र वाकडे यांच्यासह सकल मराठा समाजाचे नेते, समन्वयक उपस्थित होते.