सोलापूर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीवरुन सुरु झालेल्या आंदोलनाचा सर्वाधिक फटका सार्वजनिक मालमत्ता असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या लालपरीला अर्थात बसला बसू लागला आहे. आज गुरूवारीही जिल्ह्यातील विविध भागात गाड्यांवर दगडफेक करून नुकसान झाल्याची माहिती एस. टी. प्रशासनाकडून देण्यात आली. १९ ते २५ जुलै या सात दिवसात सोलापूर जिल्ह्यात विविध विभागाच्या ११३ बस फोडण्यात आल्या.
मराठा समाजास आरक्षण मिळावे या मागणीसाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी चक्का जाम, रस्ता रोकोच्या माध्यमातून सोलापूरसह महाराष्टÑभर आंदोलने सुरू आहेत. या आंदोलनाची धग दिवसेंदिवस वाढत असताना याचा झळ प्रवाशांच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसला बसत आहे. प्रवाशांना घेऊन जाताना रोडवर बसच्या काचा फोडण्याचे सत्र सुरु आहे. बुधवारी दिवसभरात विविध ठिकाणी चार ठिकाणी अशा घटना घडल्या.
वाडीकुरोली येथे दुपारी सव्वाच्या सुमारास कुर्डूवाडी आगाराची एम.एच. १४ बीटी ३१०८ ही बस जुन्नर ते कुर्डूवाडीकडे जात असताना अज्ञात इसमांनी दगडफेक करुन बसच्या समोरची काच फोडली. यामध्ये १८ हजारांचे नुकसान झाले. दुपारी दोनच्या सुमारास सांगोला आगाराची सोलापूर-सांगोला ही एम. एच. ०७ सी ७३५८ या बसवर दगड मारल्याने पाठीमागील काच फुटून ५ हजार रुपयांचे नुकसान झाले. वाडेगाव फाट्याजवळ ही घटना घडली. सांगोला तालुक्यातील देवडी फाट्याजवळही एम.एच. ०९ ईएम १३८२ या शिवाजीनगर-तुळजापूर बसला लक्ष्य कण्यात आले. दुपारी ४.३० च्या दरम्यान हा प्रकार घडला. यात बसचे ३ हजार रुपयांचे नुकसान झाले. पंढरपूरजवळ विसावा थांबा येथे मंगळवेढा आगाराची एम.एच. २० एन ८४२२ ही बस फोडली. बुधवारी दुपारी साडेचारच्या सुमाराला ही घटना घडली. यात महामंडळाचे ८ हजार रुपयांचे नुकसान झाले.
दगडफेकीची झळ सामान्य जनतेलाच - सकल मराठा समाजाच्या वतीने वारकºयांची गैरसोय होऊ नये म्हणून मंगळवारी सोलापूर आगारास बस सुरु ठेवण्याचे निवेदन देण्यात आले. त्यानंतरही या घटना घडत आहेत. आंदोलन कोणतेही असो त्याला हिंसक वळण मिळू नये, सामान्य जनतेचीच सेवा करणाºया बसवर दगडफेकीच्या घटना घडू नयेत. त्याची झळ जनतेला बसू शकते. संयम बाळगावा, अशा भावना जनतेतून व्यक्त होत आहेत.