सोलापूर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सोलापूर शहरात सोमवारी बंद पाळण्यात आला़ या बंदला १०० टक्के प्रतिसाद मिळाला मात्र काही आंदोलनकर्त्यांनी केलेल्या दगडफेकीमुळे आंदोलनाला हिंसक वळण लागले.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने सोमवारी सोलापूर बंदची हाक दिली होती़ सकाळपासूनच शिवाजी चौकातील दुकाने, हॉटेल्स १०० टक्के बंद ठेवण्यात आली होती़ शहरातील शिवाजी चौक, डफरीन चौक, कन्ना चौक, जुळे सोलापूर, आसरा चौक, सात रस्ता, पार्क चौक, विजापूर वेस, राजेंद्र चौक, जोडबसवण्णा चौक, अशोक चौक, बोरामणी नाका, मार्केड यार्ड परिसर, दयानंद महाविद्यालय परिसर, सम्राट चौक, छत्रपती संभाजीराजे चौक, बाळीवेस, टिळक चौक, नवी पेठ आदी परिसरातील दुकाने, व्यापाºयांनी बंदमध्ये सहभाग नोंदविला़ यामुळे शहरात दिवसभर शुकशुकाट दिसत होता़