सोलापूर : जालन्यातील अंतरवाली सराटी येथील मराठा समाजातील आंदोलनकरांवर झालेल्या आमानुष लाठीचार्जच्या विरोधात बोरामणी (ता. द. सोलापूर) येथे छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी तासभर सोलापूर-हैदराबाद महामार्गावर वाहतूक तासभर थांबली होती.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय..एक मराठा..लाख मराठा..आरक्षण मिळाल्याशिवाय गप्प बसणार नाही म्हणत सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. या रास्ता रोको आंदोलनामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागल्या होत्या. यावेळी विविध मान्यवरांनी केलेल्या भाषणातून समाजाच्या तीव्र भावना व्यक्त केल्या. पोलिसांनी आंदोलनस्थळावर मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला होता.
यावेळी भारत कवडे, शाम भोसले, विकास भोसले, रतन शिंदे, बंडू मस्के, कमलाकर भोसले, पप्पू मस्के, सुनील नागणे, नाना भोसले, अमित मोरे, अतुल कवडे, योगेश भोसले, राहुल कवडे, राज साळुंखे, राजकुमार वाघमारे, माणिक ननवरे, अभिमन्यू भगरे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तासाभरानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.