सोलापूर : लोकसभा निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारार्थ आनंद शिंदे सोलापुरात येणार होते़ ते आले नाहीत, याचे कारण विचारले असता आनंद शिंदे म्हणाले, घटनेचे शिल्पकार डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू अॅड. बाळासाहेब आंबेडकर हे देखील सोलापुरातून निवडणूक लढवत होते़ मी जर शिंदे यांचा प्रचार केला असता तर माझ्या समाजात नकारात्मक मेसेज गेला असता़ मला माझा समाज महत्त्वाचा आहे. अॅड. बाळासाहेबांचा पराभवाचा कलंक मला लागला असता़ त्यामुळे सोलापुरात येण्याचे मी टाळले असे स्पष्टीकरण प्रसिध्द गायक व महाराष्ट्र चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष आनंद शिंदे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिले.
आनंद शिंदे हे सोलापूर दौºयावर होते़ होटगी रस्त्यावरील महिबूब रेकॉर्डिंग स्टुडिओचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले़ आनंद शिंदे हे कै. प्रल्हाद शिंदे यांचे सुपुत्र आहेत़ प्रल्हाद शिंदे यांचा जन्म येथील मंगळवेढ्यात झाला. त्यामुळे येथील कलाभूमीत त्यांचा सन्मान होणे अपेक्षित असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले़ महिबूब स्टुडिओचे संचालक जब्बार मुर्शिद यांनी पुष्पगुच्छ देऊन शिंदे यांचे स्वागत केले़ स्मृती मंदिरात प्रल्हाद शिंदे यांचा फोटो लावण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
्रपुढे बोलताना ते म्हणाले की, मराठी कलावंतांना शासनाकडून घरकूल मिळाले पाहिजे़ तसेच ज्येष्ठ कलावंतांना सध्या दीड हजाराचे मानधन मिळते़ सदर मानधन पाच हजार रुपये इतके असावे़ त्यांना शासनाकडून मोफत आरोग्य सुविधा मिळाव्यात़ कलावंतांचा एक आमदार असावा, यादृष्टीने महामंडळाचे प्रयत्न सुरू असल्याचेही शिंदे यांनी यावेळी सांगितले.
स्वरसम्राट कै. प्रल्हाद शिंदे हे मूळचे सोलापूरचे आहेत़ त्यांचा सोलापुरात यथोचित सन्मान झाला पाहिजे़ हुतात्मा स्मृती मंदिरात त्यांचा फोटो लावावा, अशी अपेक्षा व्यक्त करत प्रख्यात गायक आनंद शिंदे यांनी स्मृती मंदिरात बालगंधर्वांचा फोटो आहे, मग प्रल्हाद शिंदेंचा का नाही, असा सवाल केला़ महाराष्ट्राची शान प्रल्हाद शिंदे यांना भारतरत्न देण्याची मागणी सरकारकडे करणार असल्याचेही त्यांनी येथील पत्रकारांशी बोलताना सांगितले़ महाराष्ट्र चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदावर आनंद शिंदे कार्यरत आहेत़ मराठी रंगभूमी दिनानिमित्त महामंडळाच्या पदाधिकाºयांनी यावेळी शिंदे यांचा विशेष सत्कार केला.