गोपालकृष्ण मांडवकर
सोलापूर : मायबोली मराठीला संपन्नतेचा वारसा असला तरी सध्याच्या नव्या पिढीत कसदार लेखकांची मात्र कमतरता आहे. लेखक वाढले असले तरी वाचकांना खिळवून ठेवणारे साहित्य त्या मानाने निर्माण होत नाही, अशी भावना सोलापुरातील प्रकाशकांनी मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने ‘लोकमत’जवळ व्यक्त केली.
सोलापूर शहरात चार प्रकाशन संस्था आहेत. सोलापूर जिल्ह्याच्या समृद्ध साहित्यामध्ये या संस्थांचा मोठा वाटा आहे. अनेक नामवंत कवींच्या कवितांनी आणि साहित्याने महाराष्ट्राला वेड लावले आहे. त्यांच्या लेखनामुळे या जिल्ह्याची वेगळी ओळख महाराष्टÑाला झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रकाशकांशी संवाद साधला असता वरील भावना व्यक्त झाली. सध्या लिहिणारे बरेच झाले असले तरी साध्यासोप्या भाषेत साहित्य मांडणारे मात्र कमी आहेत. अशा लेखनातून केवळ घटना मांडली जाते. संदेश समाजासमोर प्रभावीपणे जात नाही. मूल्यांची मांडणी होत नाही.
कादंबरी लेखनाचेही प्रमाण अलीकडच्या काळात घटले आहे. त्याऐवजी लघुकथा, मुक्तछंदातील कविता आणि ललित लेखनाचे प्रमाण वाढले आहे. असे असले तरी लेखनशैलीचा अभाव प्रकर्षाने जाणवतो. वाचकांना खिळवून ठेवण्यात नव्या पिढीतील साहित्यिक मागे पडल्याची खंत वाचकांना आहे. नवोदितांच्या शैलीत विविधता अधिक असली तरी अनुकरण अथवा प्रथितयश लेखकांची छाप असणारे साहित्यिक कमी आहेत.
इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणपद्धतीचा परिणाम मराठीवर होत आहे. पूर्वी दूरदर्शन, रेडिओंचे प्रमाण कमी होते. त्यामुळे वाचनावर भर असायचा. आता वाचन कमी झाले असून, नवी पिढी सोशल मीडियामध्ये गुंतली आहे.
शहरामध्ये साहित्यिक उपक्रम वाढत आहेत. गं्रथप्रदर्शनासारखे उपक्रम वारंवार होत असून, सवलतींच्या दरात पुस्तके वाचकांना देण्याचा प्रयत्न होत आहे. या उपक्रमातून मराठी मायबोलीचे संवर्धन होईल, अशी मराठीप्रेमींना अपेक्षा आहे.
अलीकडे पुस्तके प्रकाशित होण्याचे प्रमाण घटले आहे. प्रकाशन संस्थांमध्ये गुंतवणूक अधिक असल्याने या क्षेत्रात नव्याने येणाºयांचे प्रमाण घटले आहे. पूर्वी पुस्तकांची शासकीय खरेदी अधिक असायची. त्यात घट झाल्याने हा परिणाम जाणवत आहे. सोलापुरात पूर्वी वर्षाला ५० ते ६० लहान-मोठी पुस्तके प्रकाशित होत असत. आता हे प्रमाण ४० ते ४५ वर आले आहे. प्रकाशकांनी आता तंत्र बदलण्याची गरज आहे. इंटरनेटच्या युगात नव्या तंत्राचा वापर आतापासूनच प्रकाशकांनी केला, तरच पुढच्या प्रवासात टिकता येईल. वाचन ही प्रक्रिया कधीही थांबणारी नाही. फक्त माध्यम बदलणार आहे. - बाबुराव मैंदर्गीकर, प्रकाशक