विलास जळकोटकर ।
सोलापूर: बहुभाषिक सोलापूर शहरात मराठीसह विविध भाषांच्या वृद्धीसाठी, संशोधनास चालना मिळावी यासाठी २०१८-१९ पासून भाषा संकुल वाङ्मय विभाग सुरू झाला आहे. मराठीसह हिंदी, इंग़्रजी, उर्दू आणि संस्कृत विषयाच्या अभ्यासकांना ही पर्वणी ठरली आहे. नव्याने सुरू झालेल्या या संकुलानं नुकतीच मराठी भाषेच्या वृद्धीसाठी अडीच लाख रुपयांची पुस्तके खरेदी करून या विषयाच्या पदव्युत्तर विद्यार्थी, प्राध्यापक आणि संशोधकांना ज्ञानाचे दालन खुले केले आहे. याचबरोबर आगामी शैक्षणिक वर्षात नव्याने कन्नड पदव्युत्तर विभाग सुरू करण्यात येणार आहे.
सोलापूर विद्यापीठामध्ये भाषा संकुल व्हावे, ही अनेक दिवसांपासूनची मागणी होती. शिवाय नॅकच्या मूल्यांकनात भाषा संकुल सुरू करावे, असे निर्देश देण्यात आले होते. या सूचनेचा आदर करीत कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी सन २०१८-१९ पासून भाषा वाङ्मय सुरू केले आहे. या संकुलात मराठीसह हिंदी, इंग्रजी, उर्दू आणि संस्कृत विभाग सुरू झाला. यामुळे विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षणाची सोय झाली आहे. विविध महाविद्यालयात मराठी, हिंदी, इंग्रजीचे पदव्युत्तर विभाग आहेत. मात्र उर्दू आणि संस्कृत विषयांसाठी ही सोय नव्हती. याचा सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थी आणि प्राध्यापकांची, अभ्यासकांची सोय झाली अन् आता पीएच.डी. करणेही सुलभ झाले आहे. या भाषा वाङ्मय संकुलासाठी सध्या इतिहास विभागाचे प्रा. डॉ. प्रभाकर कोळेकर यांच्याकडे प्रभारी संचालक म्हणून कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी जबाबदारी सोपवली आहे.
मराठी भाषेतील साहित्याची मोठ्या प्रमाणात उपलब्धी व्हावी, या अनुषंगाने भाषा संकुलाने नुकतीच अडीच लाखांची पुस्तके खरेदी केली आहेत. यामध्ये महाराष्टÑ राज्य संस्कृती मंडळ, राज्य मराठी भाषा विकास संस्था, साहित्य अकादमी, नवी दिल्ली यांच्यामार्फत प्रकाशित सर्व पुस्तकेही उपलब्ध असल्याचे मराठी विषयाचे प्रा. डॉ. दत्ता घोलप यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले.सोलापुरात असणारा कन्नड भाषिकांची गरज लक्षात घेऊन कन्नड पदव्युत्तर विभाग नव्या शैक्षणिक सुरू होणार असल्याचेही सांगण्यात आले.
अनुवादाचा प्रयोग यशस्वी होईल- सोलापूर बहुभाषिक शहर असल्यानं आणि इथे पर्यटनाला पूरक वातावरण असल्याने विद्यापीठातून विविध भाषांची पदवी घेणाºया विद्यार्थ्यांमार्फत अनुवादाचे प्रयोग यशस्वी होऊ शकतात. परगावाहून येणाºया पर्यटकांना दुभाषी म्हणूनही त्यांचा उपयोग होऊ शकतो, अशी अपेक्षा संचालक डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी व्यक्त केली.
७० वर्षांनंतर संस्कृत पदव्युत्तर विभाग- सोलापुरात १९४० साली दयानंद महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी संस्कृत विषय अभ्यासासाठी सुरू करण्यात आला. या विषयातील विद्यार्थ्यांना पदवीपर्यंतच हा विषय घेऊन पदवी मिळवता यायची. आता सोलापूर विद्यापीठात या विषयासाठीही पदव्युत्तर विभाग सुरू झाला आहे, म्हणजे तब्बल ७० वर्षांनंतर सोलापूर विद्यापीठाच्या रूपानं ही सुविधा निर्माण झाल्याचे प्रा. डॉ. दत्ता घोलप यांनी सांगितले.