सोलापूर : सोलापूर हे बहुभाषिकांचं शहर. इथे कन्नड, तेलुगू, गुजराती, मारवाडी आणि लिपी नसणाऱ्याही भाषा बोलणारे सोलापूरकर गुण्यागोविंदानं राहतात, या शहराच्या विकासात महत्त्वाचं योगदान देतात. त्यांची मातृभाषा निराळी असते; पण ते माय मराठीवरही तितकेच प्रेम करतात. घरी जरूर त्यांची मातृभाषा बोलतात; पण शिक्षण मराठीत घेतात... व्यवहार मराठीत करतात. मराठी राजभाषा दिनानिमित्त बहुभाषिक सोलापूरकरांशी संवाद साधून ‘लोकमत’ चमूनं त्यांचं मराठी प्रेम जाणून घेतलं. प्रत्येक जण भरभरून बोलले. त्यांच्यासाठी मराठी भाषा जणू ‘जीव की प्राणच’ असल्याचं जाणवलं. मराठी बोलण्यासाठी आमच्यावर कोणी सक्ती करत नाही; पण आम्ही आवडीनं अन् प्रेमानं मराठी बोलतो, अशा प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या... अनेकांनी तर मराठी ही आमची पोट भरणारी भाषा आहे. त्यामुळे माय मराठीला आम्ही मातृभाषेइतकंच मानतो, असेही अनेक जण म्हणाले.
अमने बधाने मराठी भाषानो अभिमान छे
सोलापूर - व्यापार-व्यवसायानिमित्त शहरात स्थायिक झालेला गुजराती समाज इथल्या मातीशी एकरूप आहे. त्यांची मराठी भाषेशी नाळ जोडलेली आहे. बहुतेकजण कुटुंबीयांशी संवाद साधतानाच गुजराती भाषेचा वापर करतात. घराबाहेर पडताच व्यापार-उद्योग करताना मात्र मराठीतच संवाद साधतात. पन्नास वर्षांपूर्वी सोलापुरात स्थायिक झालेल्या हंसाबेन आणि महेंद्रभाई पटेल दाम्पत्याने आपल्या सर्व मुलांना मराठीतून शिक्षण घ्यायला लावले. मुलगा नीलेश, मुली नीला आणि कामिनी यांनी मराठीतूनच पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. नीलेश हे सोलापूर चेंबर्स ऑफ कॉमर्सचे खजिनदार असून ते अनेक सामाजिक संस्थांवर कार्यरत आहेत. त्यांची मुले ऋषित, तन्वी हेसुद्धा उत्तम मराठी बोलतात. पटेल कुटुंबीयांना मराठी भाषेचा सार्थ अभिमान आहे.
- नीलेश पटेल, व्यापारी, सदस्य चेंबर्स ऑफ कॉमर्स