सोलापूर : अवघ्या आठ दिवसात कोणताही टायपिंगचा कोर्स न करता मराठी टायपिंगचे प्रमाणपत्र चार हजारात देणाऱ्या दोघांवर विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत जोडभावीचे पोसई चक्रधर ताकभाते विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून कॉम्प्यूटर सेंटरचे अविनाश उत्तरेश्वर मठपती, श्रावणी पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
विजापूर रोडवरील आयटीआय पोलिस चौकीच्या जवळ असलेल्या कॉम्प्यूटर सेंटरमध्ये महाराष्ट्र ज्ञान मंडळ, पुणे अर्थात एमकेसीएलची टायपिंगचे प्रमाणपत्र कोणतेही कोर्स न करता मिळत असल्याची तक्रार पोलिस आयुक्त कार्यालयाकडे आली. या माहितीच्या आधारे विशेष पोलिसांचे पथक बनवून पोलिसांनी बनावट ग्राहक बनत ते कॉम्प्यूटर सेंटर गाठले. बनावट ग्राहकाने तेथील श्रावणी पाटील यांना नोकरीसाठी मराठी प्रमाणपत्र लागणार आहे असे सांगितले. तेव्हा पाटील यांनी ४ हजार रुपये मागितले. शिवाय त्यांनी २ मार्च रोजी दोन हजार आणि ३ मार्च रोज २ हजार रुपये बनावट ग्राहकाने दिले.
त्यानंतर त्यांनी ६ मार्च रोजी येण्यास सांगितले. ६ मार्च रोजी पाटील यांनी एमकेसीएलचे कॉम्प्यूटर टायपिंग स्पीड टेस्ट मराठी ९८ टक्के तंतोतंत पणा असलेले तसेच ३७ टक्के शब्द प्रति मिनीट वेगाचे एमकेसीएलचे व्यवस्थापकीय संचालक यांच्या सही व शिक्क्याचे प्रमाणपत्र दिले. आरोपींनी आपल्या आर्थिक फायद्यासाठी एमकेसीएलची फसवणूक केल्याप्रकरणी अविनाश मठपती, श्रावणी पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास सपोनि देशमुख करत आहेत.