बार्शी : माहेरी होणाऱ्या छळाला कंटाळून पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार बार्शी येथे गाडेगाव रोडवर म्हाडा कॉलनीत घडला.
अश्विनी भारत माने (वय ३१, रा. म्हडा कॉलनी, गडेगाव रोड, बार्शी) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव असून याप्रकरणी पतीसह चौघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. १ जुलै रोजी ही घटना घडली. याप्रकरणी पतीला अटक करण्यात आली आहे. याबाबत तिचे वडील भुजंग गुलाब भोसले (रा. उपळाई, ता. बार्शी) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
पती भारत सदाशिव माने (रा. म्हाडा कॉलनी, बार्शी), वडील म्हसा सदाशिव माने, कौशल्या सदाशिव माने, सदाशिव अर्जुन माने (सर्व रा. दहीटने, ता. परांडा) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
दहिटणे (ता. परांडा) येथील रहिवासी भारत सदाशिव माने हे गाडेगाव रोडवर म्हाडा कॉलनीत शेड मारून राहतात. केंद्रीय राखीव पोलीस दलात जम्मू-काश्मीरमध्ये सेवेत आहेत. काही दिवसांपूर्वीच ते सुटीवर आले होते. त्यांच्या गैरहजेरीत त्यांची पत्नी अश्विनी ही दोन मुलांसह एकाकी राहत होती. आई-वडील हे तिची देखभाल करीत होते.
मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात भारत माने यांनी चारित्र्याचा संशय घेऊन मानसिक छळ केला. माहेरच्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याने अश्विनी यांनी स्नानगृहात फिनेल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यावेळी तिला तातडीने वैद्यकीय मदत मिळाली आणि प्राण वाचले होते. त्यावेळी भारत माने याच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला होता.
तिला दोन मुले असून या लहान मुलांसाठी ती त्याचा त्रास सहन करत होती. भारत माने हे सुटीवर आल्यानंतर तिला त्रास द्यायचे अन् माझे कोणीही काही करू शकत नाही. तुझ्या बापाला, भावाला जिवंत सोडणार नाही, असे धमकावत होते. यापूर्वी दुचाकी घेण्यासाठी ५० हजार रुपये दिले होते. पुनः त्याने घराच्या बांधकामास दोन लाख मागितले; पण तिच्या वडिलाची परिस्थिती देण्यासारखी नसल्याचे तिने सांगितले. त्यानंतर सतत होणाऱ्या त्रासास कंटाळून तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. अधिक तपास फौजदार उत्तम सस्ते करत आहेत.